Sunday, October 30, 2011


बंध रेशमाचे 




ती संध्याकाळही अशीच होती. नदीवरून सायंवाराही असाच वाहत होता. .....अगदी असाच धुंद! मावळतीच्या सूर्याचे लालसर किरणही असेच सरितेच्या निळ्या शांत पाण्यावर लहरत लहरत चमकत होते. सूर्यबिंब काहीसं धूसर होत चाललं होतं. पाखरांचे थवे आपल्या घरट्याकडे परतत होते. आजच्यासारखे सुगंधित वाऱ्याच्या लहरीबरोबर लहरत येणारे गाण्याचे सूर पसरत होते. दूरवर कुणीतरी गात होतं......

"शुक्रतारा मंदवारा, चांदणे ओठात या"     
  
सारं काही तसंच......हो, अगदी तस्सच! आजही सारं तसंच आहे......पण माझं मन मात्र त्यावेळी सारखं फुललेलं आनंदी का नाही बरं?  ते आज एवढ अस्वस्थ काहीसं उदास का बरं वाटतंय? ज्या वातावरणात मी एकेकाळी उल्हासित व्हायचा, तिथंच मी आज उदासीन का? मधुर गुजारव करत येणाऱ्या लाटा आज भीषण काळलाटासारख्या का बरं भासताहेत? पाखरांच्या त्या किलबिलाटात मी तासनतास स्वत:ला विसरून जात होतो तीच किलबिल मला आज अर्थहीन कर्कश का वाटतेय? ज्या सुरांवर मी लाटांप्रमाणे तरंगत होतो, ते सूर आज कुठाहेत? सारं काही  तेथेच असूनसुद्धा काही नसल्यासारखं का वाटतंय? का मला याचा त्रास होतोय? का हेच सत्य आहे?  कदाचित तो माझ्या मनाचा गोंधळ असू शकेल.......

मला माहित आहे, ठावूकही आहे.......हे सारं अखेर सत्यच आहे. कितीही खोटं म्हटलं तरी ते सत्यच आहे..... मला त्याची कारणंही ठावूक आहेत.... ती ......होय, तीच आहे याच, या उदासीनतेच कारण!

पण तुम्हाला ती माहित नाहीय! तसं पाहिलं तर मला तरी कुठं ती माहित होती? जीवनाच्या प्रवाहात खूपजण भेटतात, तशीच तीही भेटली होती. कुठे भेटली, कशी भेटली अन केंव्हा भेटली या प्रश्नांना काहीही अर्थ नाही. पण जीवनाला खरा अर्थ आला तो ती भेटल्यानंतरच!    

'जीवनगाणे' गात फिरणाऱ्या एका भटक्याला सूर अन स्वर सापडला! जिंदगीचा नूर गवसला तो त्या पहिल्या भेटीतच! नदीच्या पात्रात दगड भिरकवल्यानंतर उठणाऱ्या तरंगाप्रमाणे माझ्या जीवनात नवे खुषीचे तरंग उठले ते ती भेटल्यानंतरच!

कधी तिच्या गालावरची गुलाबी छटा चोरून संध्याकाळ विश्वाला मोहवायची तर कधी तिच्या काळ्याभोर कुरळ्या केसांच्या वाऱ्यावर उडणाऱ्या बटाप्रमाणे अंधार सभोवताली पसरत जायचा. तिच्या पायातील पैजणांच्या नादावर ताल धरीत पाखरं भुर्रकन उडत घरी परतायची. तिच्या गोऱ्यापान भव्य कपाळावरची कुंकवाची गोल कोर नदीच्या शांत निळ्या पाण्यात पडलेल्या लालभडक सूर्यबिंबाच्या प्रतिबिंबाशी स्पर्धा करायची. मावळतीचे किरण तिच्या गालावरची गुलाबी छटा अधिकच उठावदार गडद करायचे तर तिच्या मिटलेल्या पापण्यांची अर्धचंद्राकृती नुकत्याच उमललेल्या चंद्रकोरीशी नाते सांगायची अन तिचे डोळे .......त्यांना पाहून तिला कमलनयना म्हणावं की मृगनयना म्हणावं याचाच मला प्रश्न पडायचा.  

.......पण ! पण ते आठवून आता काय उपयोग? माझ्या पायात चुकून काठावरचा एखादा खडा रुतला तर जिच्या डोळ्यातं चटकन पाणी यायचं तिला माझ्या हृदयात घाव घालताना काहीच वाटलं नाही? जिथं मनच आता  रक्तबंबाळ झालंय, तिथं पायाची काय कथा? माझ्या कपाळावर रुळणाऱ्या बटांना मागं सारणारे तिचे हात माझ्या जीवनावर काळेकभिन्न सावट आणू शकतात हे अनुभवाने पटलं.  

ती आता कोठे आहे कोणास ठावूक! ती पुन्हा भेटेल अन तिला या विश्वसद्याताचा जाब विचारावा या एका जाणीवेपायी तळमळतोय! आठवतंय......एकदा म्हणाली होती, तुझ्याशिवाय मी जगूच शकणार नाही "कृष्णाविना राधा जर राहूच शकत नसेल, तर तुझ्याविना मी कशी जगेन?".......



हो मला आठवतंय! मी त्याला एकदा म्हणाले होते....तुझ्याविना मी जगूच शकणार नाही जशी कृष्णाविना राधा........! पण .........! त्याला तोडून त्याच्या जीवनातून अखेर बाजूला व्हावंच लागलं. सारीपाटाचा डाव मांडून तो मोडावाच लागला. त्याला वाटत असेल अखेर तीही विश्वासघातकीच निघाली कदाचित नदीच्या तीरावर त्या ठिकाणी तोही जुन्या आठवणीना उजाळा देत बसला असेल. पण मी विश्वासघातकी नव्हते. मी तुला फसविलं नाही रे! कसं सांगू? खूप खूप सांगायचं पण सांगता येत नाही.........!

.........त्याला वाटेल माझं त्याच्यावर प्रेमच नव्हतं,  सारं काही नाटकंच होतं पण सत्य त्याला कधीच कळालं नाही ........अन ते त्याला कधीच कळणार नाही. त्यादिवशी त्याला तशीच सोडून आले काहीही न कळविता! अन तेंव्हापासून मीही अशी जळते आहे.

ती नदी ती सुहानी शाम! सारं काही आता विसरून जायचंय ! पण विसरून जायचं म्हटलं तरी ते कसं शक्य आहे? ते का वाळूचे किल्ले आहेत - पाहिजे तेंव्हा बनवायला अन मन मानेल तेंव्हा मोडायला ! मला माहित आहे, तो अजूनसुद्धा जळत असेल, कुडत असेल पण......! पण मी काय करू शकणार होते? त्याची स्वप्नं पूर्ण करणं मला कसं शक्य होतं! त्याची स्वप्नं फुलवून तोडण्यापेक्षा मला विश्वासघातकी समजून जाणं हेच श्रेयस्कर होतं. मी त्याला कसं सांगू शकत होते की मी........मी........मी.......मी फक्त थोड्याच दिवसांची सोबती आहे म्हणून! .......की मी कैन्सरसारख्या असाध्य रोगाची बळी आहे म्हणून ! अन त्याचं उमलत जीवन माझ्यासुखासाठी स्वास्थ्यासाठी बरबाद करण्याचा कोणता हक्क मला होता? 



 ........वेडे ! किती मोठी चूक केलीस? तू मला एवढ्या सहवासानंतर सुद्धा समजू शकली नाहीस! हीच का माझ्या प्रेमाची पारख केलीस? माझ्यासाठी एवढा मोठा त्याग केलास, मलाही त्यात वाटेकरी का नाही करून घेतलंस? अगं प्रेम म्हणजे नुसतं सुखाच्या, आनंदाच्या क्षणात वाटेकरी होणं नव्हे. दुःखाचे पर्वत देखील जोडीनं पार करणं म्हणजे प्रेम! विषाचे घोट पाचवीत पुढे जाणं म्हणजे प्रेम! काळलाटांच्या घनघोर प्रलयात आपलं शीड जोडीनं पुढं हाकण म्हणजे प्रेम! प्रीतीचे बंध रेशमाचे जरूर असतील पण महाप्रलयात काळरात्रीही न तुटण्याइतके ते मजबूतही असतात. पण.......! पण आता काय त्याच..........? तू गेलीस .......... जाताना मला रेशमी चिवट दोरान जखडून!   
  
                                             
           

Tuesday, April 19, 2011


'माझी सखी.......निराळी!'


आज 'सखी' दिसली.

म्हणजे आज खऱ्या अर्थानं 'सखी'  भेटली.

निमित्तही असंच काहीस निराळं! सखीच्या मांडीवर डोक ठेऊन मी नुसताच तिच्याकडे पहात विसावलो होतो जसा कल्पवृक्षाच्या सावलीखाली! सखी माझ्या कपाळावरून हात फिरवित गात होती.......

'जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पहाते.....वाट पहाते'

या काव्यपंक्ती सखीच्या कंठातून नुसत्याच बाहेर पडल्या नाहीत तर मला नादमुग्ध करून गेल्या. लताला सुद्धा कधी एवढा 'वन्समोअर ' मिळाला नसेल तेवढा मी आज ते गाणं सखीकडून ऐकण्यासाठी अधीर झालो होतो. गाण्याच्या प्रत्येक अक्षराला स्व:ताच  एक वजन होतं, प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ होता, प्रत्येक शब्दांनी गुंफलेल्या या काव्यपंक्तीला भावनिक ओढ तर होतीच......पण त्यापेक्षा सुद्धा सखीच्या कंठातून आलेल्या या सुरेल स्वरांना प्रेमाची, मायेची, कारुण्येची अन आपुलकेची झालर होती. त्यामुळे आज हे गाणं नुसतं सुरेलंच झालं नव्हत तर पारिजताका सारखं फुलून आलं होतं, चाफ्यासारखं सुगंधी झालं होतं, गुलाबासारखं टवटवीत तर होतंच पण निशिगंधाची ओढही तितकीच होती.

सखीचंच  गाणं आज का माझ्या मनाला एवढ भावलं?
.......कारण ते फक्त सखीच गाणं होतं. अनेक गोष्टींची ज्याप्रमाणे उभ्या आयुष्यात उत्तरं मिळत नाहीत त्याचप्रमाणे सखीच गाणंही! याचंही उत्तर मिळणार नाही. 
'सखी एक स्वप्न आहे', 'सखी एक कोडं आहे', 'सखी एक वेड आहे'..........म्हणूनच सखी इतरांपेक्षा वेगळी आहे.

'सखी' खरंच तू आजही चांगली गातेस आणि अजूनही तुझा आवाज 'तसाच ताजा आहे'
'चल उगाच कौतुक करू नकोस.'

खरंच.......तेवढे मला गाण्यातलं कळतंय आणि हो डोळ्यातलही. सखी खर सांगू? तू तुझ्या गळ्यानं गातच नाहीस मुळी...........तू गातेस ते तुझ्या डोळ्यानं........म्हणूनच जेंव्हा जेंव्हा हे गाणं मी तुझ्याकडून ऐकतो तेंव्हा तेंव्हा मला फक्त तुझ्या डोळ्यातील भाव दिसत असतात.

'वेडा आहेस'......अगदी पूर्वी होतास तसाच.......
हो, आहेच मुळी......पण वेड कशाचं यावर त्या वेडेपणाची व्याख्या ठरत असते आणि खरंतर माणसानं थोडं वेडं असावच नाहीतर जीवनातील आनंदच उपभोगता येत नाही. निस्वार्थीपणाने आपण हे वेड घ्यावे आणि स्व:ताला झोकून द्यावं. आणि माझ्या या वृत्तीला जर तू वेड म्हणत असशील तर सखी मी आहेच...... 
काही क्षण आमच्यात अशीच निषब्धता होती.......शांत झालेल्या समुद्रासारखी अन फुलू लागलेल्या चांदण्यासारखी!

'अरे असा बघतोस काय? बोल ना?'
काय बोलू? किती बोलू? आणि कसे बोलू? ज्यावेळी शब्द अपुरे पडतात त्यावेळी त्याची जागा नजरेनी घेतलेली असते आणि खर सांगू? ......म्हणूनच आज तुला पुन्हा मी नव्यानं पाहतोय....जाणतोय....आणि समजूनही घ्यावयाचा प्रयत्न करतोय.

काय काय आठवतेय तुला? माझी आठवण होत होती तुला? सखी विषयाला बगल देत होती....
'आठवण'......मी नुसताच हसलो,
'का हसलास?'....'आठवण येत नव्हती का?'
येत होती ना.
किती वेळा?
यायची मधेच केंव्हातरी......
आणि?.......
आणि तेंव्हा ढवळून टाकायचीस सगळं.
'मला बरं वाटावं म्हणून म्हणतोस?'   
'मुळीच नाही, खरंच सगळं ढवळून टाकतेस, आठवतेस तेंव्हा! संसार हा धीरगंभीर, उदात्त रागदारीसारखा असतो, तास तास चालणारा, ठाय, विलंबित, द्रुत अशा अंगानं फुलणारा, केंव्हा केंव्हा फार संथ वाटणारा, उदास करणारा, कंटाळा आणणारा, आणि मध्येच तुझ्यासारखी सखीची आठवण, ही मोठा राग आवळून झाल्यानंतरही ठुमरीसारखी असते, दहा मिनिटांत संपणारी, पण सगळी मैफल गुंगत ठेवणारी, मरगळ घालवणारी.

पुन्हा सखीने पूर्वीच्याच चातुर्यानं मला गप्प केलं, सखी सर्व जाणत होती पण तरीसुद्धा तिला आणखी खोलात जायची इच्छा नव्हती.........भूतकाळ हा भूतकाळच तिला ठेवायचा होता. सखी बोलत नव्हती......पण तिच्या डोळ्यातील भाव मला समजावत होते.

'अरे......... त्याचं काय असतं की काही काही रागदारीत काही काही स्वर वर्जच असतात त्याला तू काय करणार? म्हणून तुझ्या आठवणीत, सहवासात मला रमता येत नाही. वर्ज झालेला स्वर वाईट असतो म्हणून वगळायाचा नसतो, तर एक राग उभा करायचा असतो. त्यासाठी आपण तो खुशीनं विसरायचा असतो. वाद्यातला तेवढ्या पट्या उपटून फेकायच्या नसतात, त्यांना फक्त चुकवायचं असतं ......कळलं? .....सखी जीवनाचं मर्म सांगत होती.
  
'तुझ पटतंय गं, नाही अस नाही. पण सप्तकातले किती स्वर चुकवायचे?'
सखीनं आपल्या हाताचा तळवा माझ्या ओठावर ठेवीत मला गप्प केल अन 'बाय' म्हण अस सांगत स्वप्नांत रमण्यासाठी सिध्द झाली.

माझी सखीवरची नजर काही हलत नव्हती तरी मी अनाहूतपणे विचारलं........
'पुन्हा कधी?'
'जेंव्हा पुन्हा योग येईल तेंव्हा'.........सखीचं नेहमीचंच उत्तर.
'म्हणजे जेंव्हा आपण म्हातारे झालेले असू तेंव्हा?' माझा सखीला पुन्हा प्रश्न...  
सखी माझ्या केसांतून हलकेच हात फिरवित मोठ्यांदा हसली.......
'तस्साच वेडा आहेस'

मी अगतिकपणे सखीला बिलगलो, कुशीत विसावयाचा प्रयत्न केला......आणि जाणवलं......की, सखीचं 'जिवंत दिल' अजूनही गात होतं.......

'दूरदेशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहतांना, 
कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी मनी नसताना,
नकळत आपण हरवून जावे स्व:तास मग जपतांना,
अन मग डोळे उगडावे मग ही दिवा स्वप्नं पाहतांना,'

'आयुष्य हे............!!!'
  
  

Saturday, April 16, 2011


इवलसं मनं   



तन भी सुंदर मन भी सुंदर, तू सुंदरताकी  मुरत है, 
किसी और को शायद कम होगी, मुझे तेरी बहोत जरुरत है,
पहिले ही बहोत मै तरसा हुं, तू और न मुझको तरसाना.....
   
मुकेशच्या गळ्यातून या सुंदर काव्यपंक्ती बाहेर पडत होत्या आणि माझे मन मात्र मला कुठे दुसरीकडेच घेवून जात होते ......मी कुठेतरी हरविलो होतो ....कुठल्यातरी भूतकाळात पोहोचलो होतो......

भोवताली हिरवीगार गर्द वनराई, निळे शुभ्र आकाश, नितळ पारदर्शक पाण्यानी नटलेला समुद्र अशा सुंदर, शांत, मनमोहक वातावरणात मानव जन्माला आला. शुद्ध, स्वच्छ मनानं जन्माला आलेला माणूस याहून वेगळा असणेच कठीण. बालपणातील या निसर्गाच्या वरदानान  लाभलेल्या गोष्टी कालांतरान लुप्त पाऊ लागल्या माणसाचं मन दुसऱ्याच विकृत गोष्टीनी व्यापू लागलं. परमेश्वरानं माणसाला तन आणि मन दिल. उमलणाऱ्या फुलासारख्या या दोन गोष्टी दिल्या आणि या गोष्टींचा सदुपयोग करण्यासाठी दिली ती बुद्धी!....

पण, शेवटी माणूस तो माणूस! त्याला 'तन' आणि 'मन' यातला फरकच नाही कळला. तन आणि मन! दोन छोट्या-छोट्या अक्षरांचे दोन छोटे-छोटे शब्द. कुठेही काना, मात्रा, वेलांटी  न सापडण्याइतके सरळ शब्द. किती भावना लपलेल्या आहेत या दोन छोट्या शब्दात. ज्याला या दोन शब्दातला फरक कळला, अर्थ समजला, वागायचे कसे याचे ज्ञात झाले  त्यानेच आपल्या बुद्धीचा उपयोग केला असे म्हणावे लागेल. तन आणि मन याबरोबर परमेश्वरानं  माणसाला बुद्धी दिली ती एवढ्यासाठीच की माणूस आणि पशु यामधील फरक हा माणसाला समजावा. पण बुद्धी न चालविणाऱ्या माणसाला तन काय आणि मन काय? अर्थ एकच! 

तन आणि मन! एक दिसणारी अन दुसरी न दिसणारी. कुठली महान आणि कुठली लहान. माझ्यामते दोन्हीही महान. पण ज्याचा स्वतःच्या मनावर ताबा आहे तो माणूसच महान आणि अशा माणसाचा त्याचा शरीरावर त्याहूनही अधिक ताबा असतो. म्हणूनच माणसानं आपल्या मनाला आपल्या मुठीत ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याचं मन तडफडत असतं त्याचं कोणत्याच गोष्टीवर नियंत्रण नसतं. तो नुसताच वाऱ्याच्या प्रवाहानुसार वाहवत असतो. कारण त्यावेळी त्याची स्वतःची बुद्धीच गहाण पडलेली असते. म्हणून  माणसानं आपल्या आयुष्यात स्वतःच्या मनावर, बुद्धीवर नियंत्रण ठेवावयास हवं. या शक्तीनं आपल्यावर नव्हे. मनावर ताबा असणारा माणूस असं कोणतंच विघटीत कार्य करू शकत नाही की जे त्याच्या मनाला पटत नाही. शरीर हे दिसणारं आहे, हाडामासान  तयार झालेला तो एक सामान्य देह. शरीरावर कोणतीही झालेली जखम माणूस सहन करू शकतो पण मनाचं तसं नसतं. मनावर झालेला आघात तो कोणत्याच प्रकारे लपवू शकत नाही आणि मनाच्या खोल गाभाऱ्यात झालेली जखम तो सहजासहजी पुसूही शकत नाही. मन ते मन त्याच्या त्याच्या जखमांना औषध नसतं. असते ती फक्त एक नाजूक भावना आणि या नाजूक भावानावरच त्याचं हे मन जगत असतं. बुद्धीची साथ ज्यावेळी मनाला लाभते तेंव्हा त्याच्या मनाची व्याप्तीच वाढते. सागरासारखं अफाट असं त्याचं होतं. संकुचित वृत्तीच्या माणसांची मनही संकुचित असतात कारण संकुचित मनाला बुद्धीचं पाठबळ नसतं.

माणसानं मनावर प्रेम करावं की शरीरावर!

.......खरंतर मनावर. शरीराचा प्रत्येक अवयव मनाच्या मंदिरातूनच वाटचाल करीत असतो. मनात जर हलकल्लोळ माजलेला असेल तर सुदृढ शरीर सुद्धा साथ देत नाही. म्हणून मनाला सांभाळणे महत्वाचे. मनातील विचार हे अमृतासारखे गोड असावेत, दुधासारखे शुभ्र असावेत, पाण्यासारखे पारदर्शक असावेत आणि फुलासारखे कोमल असावेत. विचारांवर बंधन असू नये. विचाराला गती असावी, विचार पुढेपुढे सरकावयास हवेत. माणसानं मनावर प्रेम जरूर करावं पण याचा अर्थ असं नाहीय की त्यानं शरीराकडे दुर्लक्ष करावं. शेवटी तन आणि मन हेच माणसाचं व्यक्तिमत्व घडवीत असतं.

तन हे आपलंच आहे आणि मनही आपलंच आहे. तनही सुंदर आहे आणि मनही सुंदर आहे....पण.....पण......  
         
मनानं शरीरावर नियंत्रण ठेवायचं असतं आणि बुद्धीनं मनावर ताबा मिळवायचा असतो. बस्स फक्त एवढंच आयुष्यात करावयाच असतं!   

Sunday, January 23, 2011


प्रेमाला उपमा नाही......



माणसानं माणसावर प्रेम करावं तरी किती? किती म्हणजे खरंच किती? कोण सांगू शकेल याचं उत्तर?, नाही...याला उत्तर नाही. आणि कोण कुणावर किती प्रेम करतो याचेही काही मोजमाप आहे का? आयुष्यात सगळ्या गोष्टींचं वजन करता येतं, अस जर गृहीत धरलं तर प्रेमाचं का बरं नाही?..... नाही.....नाही...ते पण शक्य नाही. अरे, नजर, स्पर्श आणि अंत:करणातील भावनांनी विणलेल्या प्रेमरूपी जाळ्याच तू काय वजन करणार? अरे मित्रा, जाळ्यात एकदा अडकल्या नंतर जर तुला बाहेर पडावयाचा मार्गच माहित नसेल तर तू काय करणार? ते कोळाष्टक  आहे बाबा, नुसतं विणत जायचंय .......विणत जाताना सुद्धा त्याला नाही कळत की आपण किती विणलंय अन कुठं चाललोय. कुठल्यातरी धक्क्यानं ते तुटतं तरीसुद्धा तो ते परत विणत असतोच, कारण त्याला त्या जाळ्यातच जीवन जगायचं असतं!

चुकलास  तू,...........मित्रा, .......नजरेतील भाषा, प्रेमाचं सहारा आणि अंत:करणातील भावनांचा आवेग जर तू ओळखू शकत नसशील तर तुला प्रेमाचा अर्थच माहित नाही असे म्हणावे लागेल. मित्रा,..... नजर, स्पर्श आणि प्रेमाची भावना इतकी सर्वश्रेष्ठ आहे की नुसते शब्द कमी पडतील म्हणून निसर्गान स्पर्श निर्माण केला.....कळलं?

......पण.......पण तरीसुद्धा आपल्याला प्रेमाचा त्रास का म्हणून होतो? का मला त्याचा विरह सहन होत नाही? का त्याविना मी राहू शकत नाही? अरे, मी तर 'त्या प्रेमावर' माझ्या जिवापेक्षा जास्त प्रेम केलंय रे तरीसुद्धा मलाच का बर ते स्वस्थ बसू देत नाही? मला तिच्या विचारात का बरं अडकवून ठेवलंय? खरंच........खरंच मला याचं कुणीतरी उत्तर देऊ शकेल का?
  
......पुन्हा चुकलास,........मित्रा......अरे प्रेमात आपण काय देतो, किती देतो याचा विचार करावयाचा नसतो बाबा......आपण नुसतं आपल्याकडे जे काही आहे ते देत राहायचे असते. घेण्यापेक्षा देण्यातच आनंद मान म्हणजे सुख तुझ्या पावली स्वत:हून चालत येईल आणि एक गोष्ट लक्षात ठेव.....अंत:करणातील रसिक हा असामान्य मानव असतो, त्या रसिकाला जागवायचा तू प्रयत्न कर, म्हणजे तुला कळेल की घेण्यापेक्षा देण्यातच आनंद आहे कारण 'जिच्याशिवाय' तू राहू शकत नाहीस त्यामध्ये 'तुझ्यापेक्षा' 'तिचाच' वाट जास्त आहे......'तिच्याच' प्रेमाचं वजन जास्त आहे......'तिच्या' अंत:करणातील रसिक हा खऱ्या अर्थानं असामान्य आहे........'समजलं' ???            

                      

Thursday, January 6, 2011

गंध फुलांचा गेला सांगून.......


ट्रिंग ......ट्रिंग......मोबाईलची रिंग वाजली. ठरविलं होतं आज शनिवार आहे, सुट्टी आहे, लवकर नाही उठायचं. निवांत ताणून द्यायची. आठवड्याचा क्षीण घालवायचा. गादीत इकडून तिकडून लोळत वेळ काढायचा. सूर्याची किरणे डोक्यावर येईपर्यंत आपले डोके पांघरुणातून वर काढायचे नाही असाही अट्टाहास होता. पण सर्व काही व्यर्थ होते......कारण होतं तर तो मोबाईल आणि त्याची ती वाजणारी रिंग! 
  
चडफडतच मी पांघरुणातून बाहेर आलो. डोळ्यावर अजूनही झोप होती. अंधुकशा प्रकाशात घड्याळात किती वाजले हे पाहावयाचा प्रयत्न केला. पहाटेचे पावणे सहा वाजल्याचे पाहून अन पुन्हा त्या मोबाईलच्या वाजणाऱ्या आवाजाकडे पाहून, डोळे ताणत थोड्याश्या नाईलाजानेच मोबाईल उचलला.......जिन्याच्या पायऱ्या उतरत असतानाच मोबाईलचे हिरवे बटन दाबले आणि.....आणि....पायरीवरून पाय घसरला. मी चार पायऱ्या खाली होतो. तसाच स्वत:ला एका हाताने सांभाळीत पलीकडचा आवाज ऐकत होतो......

......हेलो......ओळखलस का?....... मी कोण बोलतेय?....... 

काही क्षण स्तब्धता ! मी स्वत:ला हलकेच चिमटा काढला तर खरचं मी जागा होतो, स्वप्नात नव्हतो. पायरीवरून पाय का घसरला हे त्याक्षणी उमजले. एरवी थोडी कर्कश वाटणारी ती रिंग आज अचानक मंजुळ का झाली हेही कळले. एखाद्या बंदुकीतून जशी गोळी सुटावी व शरीरातून आरपार जावी.......तसे ते दोन शब्द थेट माझ्या हृदयाला जाऊन भिडले होते व त्या शब्दांनी आपला संदेश तात्काळ मेंदूला कळविला होता. मेंदूचं आणि हृदयाचं हे देणं-घेणं सुरु असतानाच माझ्या शरीरातून एक नकळत शिरशिरी येऊन गेली. 

......हेलो......ओळखलस का?....... मी कोण बोलतेय?.......

या पुन्हा उच्चारलेल्या शब्दांनी डोळ्यावरची झोप केंव्हाच उडाली होती. जो आवाज मी अडीच दशकामागे कळत-नकळत मागे सोडून आलो होतो तो आवाज आज.... आज तसाच......अगदी तसाच.....हुबेहूब......जसा कालच ऐकला होता तसाच माझ्या कानात नाद करीत होता. तोच आवाज, तीच लय, तेच सूर, तोच कंप, तीच भावना, तोच आनंद, तोच अधिकारपणा, तीच अदाकारी, आवाजात तीच लकीर, तीच ताकद......तीच मादकता......सर्वकाही  तेच......अगदी जसेच्या तसे......आवाज मी न ओळखणं शक्यच नव्हतं........ओळखलस का? या प्रश्नांकित शब्दांच्या वेळीच मी तिला नुसती ओळखलीच नव्हती तर पहाटेच्या अंधुकशा प्रकाशात सुद्धा माझ्या डोळ्यासमोर जशीच्या तशी तिला उभी केली होती. मेंदू आणि हृदयानं आपल काम चोख पार पाडलं होतं अन नियतीचा न जुळलेल्या स्वरांची बंदिश बांधण्याचा खटाटोप चालला होता ! 

......हेलो......ओळखलस का?....... मी कोण बोलतेय?.......   
            
याच क्षणी आठवलं पृथ्वी गोल आहे असं शाळेत का सांगायचे....जग खूप लहान आहे.....मुठीत मावण्याएवढे असं का म्हणायचे......ऐकणं आणि बोलणं यामध्ये फक्त चार बोटांचच अंतर असतं असं का सांगितलं जायचं.....इतिहासाची पुनरावृत्ती होते असं का शिकवलं जायचं.....एक राजा असतो, एक राणी असते.....त्यांचे भांडण होते.......अन शेवटी ते सुखाने संसार करू लागले ...अशा गोष्टी का असायच्या.......जावून येतो असं म्हण असे घरी का शिकवायचे........सर्व काही उमजत होतं आज पहाटेच्या प्रहरी.........आणि हेही काळात होतं की 'दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघां पुन्हा नाही भेट'......हे ही किती खोटं होतं.

......हेलो......ओळखलस का?....... मी कोण बोलतेय?.......

शब्दांच काय गं, ते तर काना, मात्रा आणि वेलांटी यांनी भरलेला शब्दसंग्रह! त्याचा अर्थ कळतो जेंव्हा लेखक आपल्या लेखणीतून एकएक मणी गुंफावा तसे शब्द गुंफतो आणि जसा अलंकार बनवावा तशी कथा लिहितो.

शब्दांच काय गं, ते तर स्वर आणि व्यंजनाने भरलेला संच ! पण याचाही अर्थ उमजतो जेंव्हा प्रतिभाशाली कवी त्या शब्दांना आपल्या दोरखंडानी बांधतो, संगीतकार त्याला आपल्या स्वरांनी नादमुग्ध करतो आणि गायकाच्या गळ्यातून जसेच्या  तसे उतरवितो.

तसेच हे तुझे पहाटेचे दोन शब्द.......माझ्या लेखणीस गुंफलेले आणि मनांत गुंतलेले!.......आपुलकीचे, आपलेपणाचे आणि ओलाव्याचे !

......हेलो......ओळखलस का?....... मी कोण बोलतेय?.......

तुला माहित आहे.......ओळख ही आवाजात नव्हतीच मुळी.....ती आवाजाच्या पलीकडची होती, ओळख होती ती स्पंदनाची ! स्पंदने होती हृदयांची की जी हजारो मैलावरून सुसाट वाऱ्याच्या वेगानं आलेल्या धूमकेतूची. तू मोबाईलचे हिरवे बटन दाबलेस तेंव्हाच ही स्पंदने एकजीव झाली होती आणि ओळखही तेंव्हाच झाली होती......कुठतरी त्याच रुपांतर फक्त शब्दात झालं होतं जेंव्हा मी माझ्या मोबाईलचे हिरवे बटन दाबले तेंव्हा.....
  
म्हणून आजही तुला ओळखण्याचा प्रश्न नव्हताच.......आपली ओळखही होतीच.....ओळख होती ती 'बालपणाची', ओळख होती ती 'अपूर्ण स्वप्नांची', ओळख होती ती 'न विसरलेल्या आठवणींची', ओळख होती ती 'भातुकलीच्या खेळामधली'........जशी काल......तशीच आजही......

..............फक्त  'क्षणभरासाठी' या दोनही आवाजांनी थोडी विश्रांती घेतली होती ! ......पुन्हा नव्यानं भेटण्यासाठी ..........!

........हेलो......ओळखलंय मी तुला.......तू...... ??? !!! 
  

       

Sunday, December 19, 2010

"अशी पाखरे येती....."


"अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगत-सांगत, दोन दिसांची नाती."

खरंतर मी हे काव्य फारसे ऐकत नाही. ऐकत नाही म्हणजे भावनांच्या बांधिलकीन मन असहाय्य होत म्हणून. पहाटेच्या आरंभीच हे शब्द कानावर पडले आणि मन बेचैन होऊ लागले. तसं पाहिलं तर हे काव्य अंतकरणाला भिडणारं आहे. भावनांच्या चक्रव्युहात शब्द व  सूर गुंतलेले पूर्णपणे जाणवतेय म्हणूनच ज्याज्यावेळी मी हे शब्द ऐकतोय त्यात्यावेळी माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहतात. हृदयापासून आलेल्या भावनांना माणूस रोखू शकत नाही हेच खरे.

तू म्हणालीस, रक्तापेक्षा या जगात अश्रूच जास्त पवित्र असतात.कारण तू ते अनुभवलयस......खरंच आहे हे. रक्तात संकर होऊ शकतात पण अश्रू निर्मळ गंगा आहे. रक्ताची नाती तुटू शकतात. पण अश्रुंच नातं तुटत नाही म्हणूनच मी सुद्धा रक्तापेक्षा अश्रुंनाच जास्त महत्व देतो.

जाणाऱ्या माणसाला आपण कधीच रोखू शकत नसतो. परंतु त्या माणसाबद्दल आपल्याला प्रेम का बरं असावं? आपण ज्याच्याकडे अभिमानानं, आदरानं पाहतो अशी माणस आपल्या आयुष्यात क्षणभरासाठी का म्हणून येतात? आणि का म्हणून आपण त्यांच्याकडे आकर्षिले जातो? खरंच या प्रश्नांना काहीही उत्तरे नाहीत. म्हणतात ना माणूस जसा नेहमी एकता असतो तसे त्याचे मनही! आणि शेवटी आपल मन हे आपणच मरावयाचे असते. आपल्या विरुध्द तक्रार घेवून ते कोठेही जात नाही, कोठेही बोलू शकत नाही. परंतु ज्या माणसाचं 'दिल' कुठेतरी जिवंत आहे, त्या माणसाला ह्या सर्व गोष्टींबद्दलच प्रेम असतं. आणि प्रेम निर्माण व्हावयास आकर्षणाची  जरुरी नसते तर सहवासाची गरज असते. जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त म्हणून तितकीच आपुलकीही जास्त!
  
कुठतरी मी वाचलं होतं की माणसानं एकदा जीवन हे जगण्यासाठी आहे हे मान्य केलं की, ते जीवन जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे जगावं. पण चांगले जगण्यासाठी पैसाच हवा असतो असे नाही.......हवा असतो मनाचा उमदेपणा, हवी असते रसिकता!

तुला माहित आहे, जीवन कसं असावं? तर ते जंगलातून अवखळपणे वाहत जाणाऱ्या झऱ्याप्रमाणे असावे - प्रवाही, नितळ, पारदर्शक!

जाता जाता तुला एवढेच म्हणावेसे वाटतेय,

"कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी,
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजूनही गाती"
      

Sunday, December 12, 2010

'ती आणि तिचा मी'



आज बऱ्याच दिवसानंतर कोरा करकरीत कागद आणि शाईनं भरलेलं पेन हातामध्ये होते. पण काय लिहावयाचे हेच कळत नाहीय. कळत नाही म्हणण्यापेक्षा विषय मिळत नाही, आज शब्दांना पुढे सरकावेसे वाटत नाही, शब्दाविण वाक्य पूर्ण होत नाहीत आणि त्यांना दिशाही मिळत नाहीय. माझ्या मनामध्ये आज विचारांची इतकी गुंतागुंत आणि गर्दी झालीय की मी मलाच हरवून बसलोय. आज कुठे हरविल्यात या सर्व गोष्टी? का थांबलेय माझी लेखणी? खरंच का मी सर्व काही विसरलोय? खरंच का मला आज काहीही आठवत नाहीय? का मन अस बेचैन होतंय?.....नाही.....नाही मला.....नाही कळत......तू सांगशिल?  

.....नाही, नाही, तू काहीच नाही विसरलास आणि हो विसरशील तर कसे? कशा विसरशील तू सगळ्या आठवणी? कशी विसरशील तू सुखदु:खाची तुझीच कहाणी? कसे विसरशील तू तिला आणि कसे विसरशील ते नाजूक जोपासलेले क्षण?

....खरंय तुझे! बाल्यावस्थातील निरागसता संपली, कुमारवयातील आकर्षण संपले, तरुणाईचा जोश ओसरत चालला म्हणून थोड्याच आठवणी पुसल्या जाणार? आठवणी त्या आठवणी, मग त्या सुखद असोद वा दु:खद...त्या आठवणारच.....म्हणूनच दोन दशकामागे घडलेल्या गोष्टी एखादा चित्रपट पुढे सरकावा तसा आज माझ्या डोळ्यासमोरून सरकतो आहे. फरक आहे तो कृष्णधवल ते रंगीत चित्रफितींचा. 

आठवतात मला 'ते' दिवस. आठवतात 'त्या' आठवणी. आठवतो तो तिचा बाल्यावस्थातील निरागस चेहरा. आठवतंय ते अल्लड आणि नटखट वागण आणि आठवतोय तो डोळ्यातील निष्पाप भाव! आठवतात त्या शेजारी बसून मारलेल्या गप्पा..... आठवते 'ते' तुझं बघणं!....आठवते ते घर...आठवतात त्या जिन्याच्या पायऱ्या आणि आठवतो तो तुझ्या नाजूक पायांचा होणारा मंजुळ आवाज! आठवते ती तुझी खोली.....आठवते ती पहाट आणि आठवतो तो चहाचा कप!.....आठवतेय 'धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना'...'अजून आठवे ती...', आठवते ती जगजीत-चित्राची तुझी आवडती गझल.....आणि आठवतात ती 'आठवणीतली सर्व गाणी'! 

तुला माहित आहे?.....एखादं कमळ पकडायचं म्हणून भुंगा भ्रमण करीत नसतो आणि भुंग्यान आपल्याकडे पहावं म्हणून कमळ फुलत नसतं. फुलणं हा कमळाचा धर्म असतो आणि भुलणं हा भुंग्याचा स्वभाव असतो. म्हणूनच आपण कमळाकडे आणि भुंग्याकडे बघून 'फुलावं कसं आणि भुलाव कसं' हेच शिकावं. आणि हे शिकत असतानाच कमळ फुलतं होतं आणि भुंगा भुलत होता. कमळाला कळत नव्हतं की भुंगा आपल्यासाठी भ्रमण करतोय आणि भुंग्याला उमजत नव्हतं की कमळ आपल्यासाठी फुलत नाहीय. कमळ कधी फुलून आलं आणि निघून गेलं हे भुंग्याला कळलंच नाही.....
भुंगा मात्र वेड्यासारखा भ्रमण करीत राहिला कमळासाठी! 


माणसानं एकदातरी समुद्रकिनारी जावं आणि अनुभावावित 'ती सुखदु:ख' ! वाळूचे आपण मनोरे बांधावेत, घरटीही बांधावित आणि अचानक एका लाटेनं ते उध्वस्त करावेत. पुन्हा जोमानं आपण ते बांधण्याकरिता धडपडावे आणि वेड्या आशेनं ते पूर्ण होईल अशी वेडी स्वप्नं पहावित......पण पुन्हा तीच लाट....आणि पुन्हा तेच भंग पावलेलं अधुरं स्वप्न! .... लाटेला कळत नसतं की आपण कुणाचीतरी स्वप्न उध्वस्त करतोय आणि घरट बांधणा-याला  कळत नसतं की स्वप्न साकार होणं आणि भंग पावणं यामध्ये फक्त चार पावलांच अंतर असतं!....हा डाव अर्ध्यावरती मोडत असतो तरीही आपण हा भातुकलीचा खेळ खेळतच असतो......तिच्यासह.....!     



जाऊदे, आज काही चिंचा गोळा करायच्या नाहीत की म्हातारीचे उडणारे केस पकडायचे नाहीत, आईस्क्रीमच्या लाल गोळ्याची ओढ नाही की पतंगामागे धावायचेही नाही. लगोरी नाही की विटीदांडू नाही.....आहेत त्या फक्त आणि फक्त 'आठवणी'..........तू म्हणालीस, तो भूतकाळ आहे 'विसर' ! पण भूतकाळ असा थोडाच विसरला जातो?...

माणूस जगतो तोच मुळी भूतकाळावर! जोपर्यंत त्याच 'मन' जिवंत आहे तोपर्यंत तो भूतकाळातील आठवणी आठवत असतो. आठवणी या सुखदही असतात आणि दु:खदही! सुखद आठवणीना कवटाळून आपण पुढचा प्रवास करावयाचा असतो आणि दु:खद आठवणी म्हणजे मनातील साठलेली जळमट.....कधीतरी साफ ही करायचीच असतात. भूतकाळ मला आज असाच मुद्दाम आठवावा लागला......न विसरलेल्या आठवणी पुन्हा नव्यानं जाग्या करायच्या होत्या......

.....कोरा करकरीत कागद आणि भरलेलं शाईचं पेन शब्दांची वाट पहात होते. पण शब्द थांबले होते, त्यांना दिशा मिळत नव्हती...कारण आज मनावर विचारांचं संपूर्ण वर्चस्व होतं आणि या विचारात होती फक्त 'ती आणि तिचा मी'!
                                
 .....सखी, बघ तुलाही आठवतोय का........'मी आणि माझी तू' ! 

Sunday, December 5, 2010

अजून आठवे 'ती'...


ती अशीच एक संध्याकाळ होती, अशीच म्हणजे रोजच्यासारखी शांत ! बागेतील हिरव्यागार गवतावर पहुडलो होतो. वाऱ्याची झुळूक थंडीचा गारवा सांगत होती, ऊन अन सावलीचा लपंडाव तर सुरूच होता. 'सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का?'.....असे फडके आपल्या हळुवार आवाजात गात होते.  शेजारील गरम चहाचा कप थंडीचे अस्तित्व नाहीसे करण्यासाठी धडपडत होता. समोरील वृक्षांवर राघू-मैनेची काहीतरी हितगुज चालली होती. माझी नजर नकळत त्या दोघांवर स्थिरावली अन मी माझे मलाच विसरून गेलो. शरीरान मी गवतावर होतो परंतु मनानं मी केंव्हाच दूरवर जावून पोहोचलो होतो. माझ्या मनावर आता विचारांचं पूर्ण नियंत्रण होतं. माझ्या मेंदूची चक्रे अतिशय वेगानं फिरत होती. माझ्या मनात 'ती' होती, माझ्या विचारात 'ती' होती, माझ्या भोवती 'ती' होती आणि माझ्या नजरेतही 'तीच' होती. मला आता कशाचेही भान राहिले नव्हते. शेजारील कुठल्याही अस्तित्वाची जाण राहिली नव्हती, माझं माझ्तावर नियंत्रण नव्हत. मी माझा राहिलेलो नव्हतो, 'तिचं' माझ्यावर नियंत्रण होतं. माझा चेहरा स्थिर आणि गंभीर असावा  म्हणूनच पक्षांनीही आपली किलबिल आता थांबविली होती. समुद्राच्या खळखळणाऱ्या लाटा आज माझ्या मनांमध्ये थैमान करीत होत्या. मनामध्ये विचारांची आज जणू भरतीच आली होती. मी गंभीर होत होतो; माझं हास्य कुठतरी लुप्त पावलं होतं. मी तिच्या कालचक्रात पूर्णपणे गुरफटलेलो होतो. मला फक्त 'ती' हवी होती......फक्त 'ती'! तिच्या शिवाय माझं जीवन म्हणजे हृदयविना शरीर अस माझं मन माझ्या हृदयाला समजावीत होतं. तिचं माझ्यापासून क्षणभरासाठी दुरावण हे सुद्धा मला आता असहाय्य होत होतं. तिच्या प्रेमाच्या सावलीत अन मायेच्या आधारात राहण्यासाठी मी धडपडत होतो.    

अचानक माझ्या चेहऱ्यावर दव जमू लागल्याचे मला जाणवू लागले अन मी हलकेच माझे डोळे बाजूला फिरविले.....तर.....तर.....ते दव नव्हते,.....तर.....'ती' माझ्या शेजारी अश्रू ढाळीत बसली होती. तिचा मायेचा हात माझा चेहरा गोंजारीत होता, तिला मला काहीतरी सांगावयाचे होते पण शब्द फुटत नव्हते. 'ती' नुसतेच आपल्या नयनांनी सांगावयाचा प्रयत्न करीत होती पण तिचा स्पर्श बरंच काही सांगून जात होता.  'तिच्या' दु:खाची तीव्रता ही माझ्या दु:खापेक्षा कितीतरी जास्त होती तरी 'ती' आज मला समजावून घेण्याचा अन समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होती. माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू जमा झाले होते, आणि मी लहान मुलासारखा तिच्या कुशीत रडत होतो, माझ्यासाठी, माझ्या अश्रुसाठी 'ती' हुंदके देत होती. मी रडत होतो ते जीवन कस जगावं हे न समजल्यामुळे अन ती हुंदके देत होती ते तिला बालवयात झालेल्या वेदनांसाठी ! 

सूर्य अस्ताला चालला होता, राघू-मैनेची आपापल्या घरट्यांकडे जाण्याची धडपड चालली होती....आम्ही मात्र तसेच स्तब्ध होतो, निरभ्र आकाशाकडे बघत अन लखलखणाऱ्या चांदण्याच्या शोधात......उरलेल्या आयुष्यातील सुखाचे क्षण मिळविण्यासाठी आणि एकमेकांना देण्यासाठी....

........शेजारील थंडगार चहाच्या कपात दुधाची साय वाऱ्यासोबत तरंगत होती आणि कुठेतरी..... कुणीतरी...गात होतं ....... 
 '.........तू अशी जवळी रहा!'    

Sunday, November 28, 2010

'ती'


तिच्यापासून आज मी बराच दूर होतो. बराच म्हणजे हजारो मैलांवर. जितक्या तिच्या जवळ राहून सुखं उपभोगीत होतो. तितक्याच दूर आज राहून दु:ख पचविण्याची  तयारी चालू होती. सुखाचे महत्व काय असते याची जाणं ही आज येत होती. निसर्गाला खूप जवळून पाहण्याचा योग येत होता. निसर्गानं आपल्या सौंदर्याची उधळण इतकी का करावी अस राहून राहून वाटत होतं. कारण हे सौंदर्य या माझ्या इवल्याशा डोळ्यांमध्ये सामावण्यासारखे नव्हते. आपण कोठेतरी वेगळ्याच विश्वात पोहोचल्याची जाणीव होत होती. निसर्गानं पसरविलेल्या हिरव्यागार मखमली गालिच्यावरून हलकेच पाऊले चालत होती. तळव्यांना आल्हाददायक स्पर्श होत होता. समोर वाऱ्याच्या हलक्याच धक्यान वृक्षांच्या फांद्या आपल्याच नादात डुलत होत्या. वेगवेगळ्या रंगातील फुले मनाला भोवळ घालीत होती. तेवढ्याच नैसर्गिक रंगान आकाश सजविण्यास सुरुवात केली होती आणि न राहवून पक्षांनी आपली हलकीच किलबिल सुरु केली होती. या हिरव्यागार वनराईतून पारदर्शक पाण्याचा झरा खळखळ आवाज करीत हृदयाची स्पंदने वाढवित होता. निसर्गानी आपली मैफिल सजविली होती. तो कुणाच्यातरी येण्याच्या प्रतीक्षेत होता. मी वृक्षांच्या आडोशाला उभा होतो. माझ्या अस्तित्वाची जाणीव न होऊ देण्याची मी काळजी घेतली होती. सर्वत्र सन्नाटा पसरलेला होता. काहीतरी घडणार आहे याचा संकेतच जणूकाही मिळत होता. तेवढ्यात अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याची जाणीव झाली. पक्षांनी किलबिल करीत आकाशाकडे झेप घ्यावयास सुरुवात केली. कळ्यांनी आपल्या रंगात आणखीनच भर टाकीत फुलावयास सुरुवात केली. सूर्याची तांबडी किरणे ढगाच्या पोकळीतून डोकाऊ लागली. पाण्याचा खळखळाट वाढला होता. पाण्याच्या लाटा एकमेकांवर आपटून त्याचे शिंतोडे माझ्या अंगावर येत होते. मी वृक्षांच्या एका कोपऱ्यात तसाच स्तब्ध उभा होतो. समोर धुकं पडल्यानं फारस काही  दिसत नव्हत. एवढ्यात कुठूनतरी छन.....छन.....हे मंजुळ स्वर कानी पडले. आवाजाच्या दिशेन मी मान फिरविली पण तेथे काहीच नव्हते. पुन्हा तोच आवाज, मी न राहवून सर्व बंधने तोडून त्या आवाजाच्या दिशेन धावू लागलो. धुक्याचा पडदा फाडून मी त्या पडद्यापलीकडे पोहोचलो आणि......आणि.......  
  
.......आणि समोर 'तीच' होती....हो, तीच होती. हिरव्यागार वस्रामध्ये तीन स्वतःला लपविले होते. निसर्गाच्या वरदानान लाभलेल्या केसांच्या झुल्याला वाऱ्याच्या दिशेन मोकळ  केलं होतं.  सूर्याची लाल किरणे कर्णफुलांची लकाकी वाढवित होता. नाकातील नथ सौंदर्य फुलविण्यामागे लागली होती. हातातील बांगड्यांचा खळखळाट हा पाण्याच्या आवाजाला आव्हान देत होता. चंद्रकलेची कोअर कपाळावर सौंदर्याला पूर्णत्व देत होती.  ती हळूहळू आपल्या नाजूक पावलांनी माझ्याजवळ येत होती. हृदयाचा एकएक ठोका चुकत होता. अंगावर कंप निर्माण झाला होता. बोचऱ्या थंडीत सुद्धा घाम फुटू लागला होता. खरंच वनराईच्या सानिध्यातील ते दृश्य मनमोहक असेच होते. ती आता माझ्या जवळच होती. तिने आपल्या चेहऱ्यावर ओघळणाऱ्या केसांच्या बटाना मागे सारले होते. तिने आता आपल्या ओठांची ठेवण बदलीत माझ्याकडे पाहत स्मितहास्याची फुंकर मारली होती. नजरेची भाषा बरंच काही समजावून जात होती. काही क्षणाचाच हा प्रसंग होता. तिची पाठमोरी आकृती माझ्या नजरे समोरून दूर जात होती. माझ्या पावलांचा वेग आता वाढला होता. तिला गाठायचं होतं. ती माझ्या बरीच पुढे निघून गेली होती. तिच्या एका हास्यान माझ्यातला मी हरवून बसलो होतो. माझं वेड मन तिच्या माग धावत होतं. आता मला कशाचही भान राहिलं नव्हतं. तिची पुसटशी आकृती धुक्याआड जात होती. मी असाच बेफान झालो होतो. तिला मी गाठली होती. तिच्या खूपच जवळ आता मी पोहोचलो होतो. मी न राहवून तिच्या जवळ जावयाचा प्रयत्न केला. कड्यावरून केंव्हाच तोल गेला होता आणि......... 

.....आणि एक .....एक व्याकुळ किंकाळी अनंतात विलीन झाली होती. वृक्षांवरील पक्षांनी पुन्हा किलबिल सुरु केली होती. वनराई शांततेत नांदत होती आणि ती माझ्या 'त्या' निस्तेज देहाकडे पाहून 'हसत' होती!         

Sunday, November 21, 2010

     स्वर आले जुळूनी.........



'स्वर आले दुरुनी जुळल्या सगळ्या त्या आठवणी' या दर्दभऱ्या काव्यपंक्ती माझ्या कानावर आल्या आणि पुनश्च मला भूतकाळातील माझ्या जीवनांत सोडलं गेलं. खरंच माणूस जगतो ते भूतकाळातील आठवणीवरच. मग त्या आठवणी सुखद असोत वा दु:खद. आठवणी त्या आठवणी. भविष्य आपल्याला माहित नसतं. उद्या समोर काय असेल याची जाणीव नसते. अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी असतं पाठबळ ते आठवणीचं! म्हणूनच भविष्याचा सुखद कळस गाठण्यासाठी लागतो तो आठवणींचा भक्कम पाया! 

माणसाचं नात कधी, कुणाशी, कुठे जुळेल हे सांगणच कठीण. आपल्या नशिबात काय आहे हे समजण त्याहूनही कठीण. आपलं नात कुणाशी जोडलेलं आहे हे नियती ठरवीत असते आणि कालचक्रानुसार ते घडतही असते. म्हणूनच आज अशा दुर्लभक्षणी तुझी आणि माझी भेट झाली. भेटीला किमंत नव्हती पण नजरेतल्या शब्दांना अर्थ होता. न बोलता दोन्ही मनें एक झाली होती. भविष्याचा जोडीदार मिळाला होता. नियतीन तुझी-माझी भेट घडवून आपला डाव साधला होता. संसाररूपी रथाच्या चाकांना तुला आणि मला बांधले होते. नकळत तू मला होकार दिलास आणि माझ्या हृदयाची दारे तुझ्यासाठी मोकळी झाली. जीची वाट पाहिली ती तुझ्या रुपानं माझ्या जीवनांत आली होती. म्हणूनच तुझ्या नी माझ्या ऋणानुबंधनाच्या या गाठी जुळल्या त्या आयुष्यभरासाठी! 

प्रेमाची भाषाच निराळी. ती कधी शब्दातून व्यक्त होते तर कधी काव्यातून, कधी नजरेतून तर कधी स्पर्शातून, अर्थ एकचं पण तऱ्हा वेगळ्या. पण या सर्व गोष्टींसाठी लागतो तो सहवास! जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त. तुझ्या सहवासातच माझं प्रेम जन्म घेत. तिथंच बागडत,  तिथंच फुलत, तिथंच खुलत. फुलत-खेळत उतुंग शिखरावर पोहोचत आणि शेवटी तुझ्यातच ते विलीन होत. तू असलीस तरच माझ्या प्रेमाला भरती येते. तू असलीस तरच त्याचं अस्तित्व राहत. तुझ्याशिवाय माझ्या या प्रेमाला किमंत नाहीय. तुझ्या एका हाकेन हे प्रेमरूपी पंख फडफडावयास लागतात. उंच भरारी मारण्यासाठी तडफडू लागतात. तुझ्या मनातील भावना तुझ्या हळुवार शब्दांनी मला भूलावितात. तुझ्या नजरेतून तुझ्या अंत:करणातील हलकल्होळ मला जाणवतोय. तुझ्या पुसटशा नाजूक स्पर्शान हृदयातील किलबिल समजतेय. तुझ्या डोळ्यातील रवि आणि  चंद्र आज काहीतरी सांगू पाहतायेत. तुझ्या नेत्रातील रवि माझे जीवन प्रकाशमय करतोय तर तुझ्या डोळ्यातील चंद्र माझ्या वेदनांना हळुवारपणे लपवितोय. 

...........असं वाटतंय की तुझं प्रेम हे माझ्या जीवनातील एक अमूल्य ठेव आहे आणि या संपत्तीच्या पायावरच मला तुझ्या-माझ्या जीवनाचा, सुखाचा, आनंदाचा कळस गाठायचाय!

Tuesday, November 16, 2010

सुखं



माणूस आयुष्य जगतो कशासाठी? माणूस आयुष्यात जे करत असतो किंवा करवित असतो, ते सर्व कशासाठी? नावलौकिकासाठी, पैशासाठी, समाजासाठी की स्वतःच्या सुखासाठी? मला तर वाटत की माणूस आयुष्यात जे काही करत असतो ते सुखं नावाच्या मृगजळासाठी. धावून धावून थकतो तरीही तो या मृगजळा मागे धावायचे काही थांबत नाही अन त्याचा पिच्छा ही सोडत नाही. सुखासाठी तो काहीही करू इच्छितो, शकतो, पण .....पण तरीही माणूस सुखी असू शकतो? .....नाही ....नाही माणूस हा या कालचक्रात कधीही सुखी राहू शकत नाही. कितीही गोष्टी त्याला मिळाल्या तरी त्याची भूक ही संपताच नाही. त्याचा आत्मा हा सदैव अतृप्तच राहतो. 

जगी सर्व सुखी असा कोण आहे? ........कोणीही नाही ! अन असणारच नाही. याचं  कारण एकंच........आणि ते म्हणजे माणसाचं मन !  जोपर्यंत माणसाचं मन जीवंत राहत तोपर्यंत तो अतृप्तच राहतो.

मन !

किती महान रहस्य लपलेली असतात फक्त या दोन शब्दात ! खरंच काय आहे हे मन म्हणजे ? जगातील प्रत्येक माणूस म्हणजे मनोभावनांच्या असंख्य दोरखंडानी जखडलेला एक हत्तीच नसतो का ? जिथल्या तिथेच एक सारखा हलणारा, स्वतःला स्वतंत्र आणि सामर्थ्यवान  मानणारा तरीही अस्वस्थ असणारा !    
      
सुखं म्हणजे नक्की काय ? सुखाची नक्की व्याख्या तरी काय ? माणूस सर्वांगाने सुखी असा कधी समजायचा ?......कठीण आहे याचं उत्तर. सुखाच्या अनेक व्याख्या  येतील परंतू सुखाची व्याख्या सांगणारा माणूस स्वतः सुखी असू शकेल ? ज्याला सुखं म्हणजे काय हेच जर माहित नसेल तर त्याने काय बोलावे? खरंच मला सुखं म्हणजे काय ? हेच अजून कळलेले नाही आणि जे समजले, उमजले ते एवढेच की सुखाला फक्त दोन गोष्टी हव्या असतात, .....फक्त दोन....आणि त्या म्हणजे 'तन आणि मन' !

.......'तन आणि मन' यांनी तृप्त असणारा आत्मा म्हणजे सुखं. मी सुखाची एवढीच व्याख्या करू शकतो. या व्यतिरिक्त सुखं म्हणजे काय मला माहित नाही.

तुला माहित आहे?.....सांगशिल ?......

जीवन म्हणजे म्यानातल खड्ग ! माणसाचं शरीर हे म्यानासारख असतं आणि त्याचं मन हे त्या म्यानातल्या खड्गाच्या तीक्ष्ण पात्यासारख असतं. या जीवनरूपी खड्गाला आत्मारूपी मुठ असते. म्हटलं तर त्या मुठीचा त्या खड्गाशी व त्या म्यानाशी संबंध आहे अन म्हटलं तर नाही. पण मुठच नसती तर ते खड्ग चालेल का? म्यानाला शोभा येईल का? आत्म्याशिवाय जसं शरीर तसंच म्यानाचही.  ना शरीराला अर्थ ना मनाला !

म्हणूनच 'तन आणि मन' तृप्त असण हेच या जीवनातील सुखं आहे, अमृत आहे. पण ........पण ......याही गोष्टी माणसाच्या एकट्याच्या हातात नसतात. या दोन्ही गोष्टींसाठी त्याला दुसऱ्याचा आधार हा घ्यावाच लागतो. तसं पाहिलं तर जीवनाला सर्वांगान पूर्णत्व येत ते जोडीदाराच्या सहवासान. म्हणूनच सुखाला सावली ही असावीच लागते कारण टाळी कधीच एका हातान वाजत नसते, तर दुसरा हात हा लागतोच....फक्त.....
.....फक्त तो हात आपलाच नसावा.     

Saturday, November 13, 2010

जीवन! 



सुखं दु:खाच्या उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेलं एक नाजूक वस्त्र म्हणजे जीवन! जीवन म्हणजे सुखदु:खाचा एक प्रवास - जन्मापासून मृत्युपर्यंत, आशा आकांशानी भरलेला प्रचंड महासागर म्हणजे जीवन! जीवन म्हणजे गाणे - कधीच न संपणारे! भग्न स्वप्नांचा विचार करीत, येणाऱ्या स्वप्नांची आशा करीत राहणारे एक जिवंत शरीर म्हणजे जीवन! सुखाच्या शोधात तरंगणारी नौका म्हणजे जीवन!

जीवन म्हणजे काय? ........कधीही न उलगडणारे एक कोडे!

अशाच प्रेमाच्या शोधात भटकणाऱ्या माझ्यासारख्या वेड्याचं हे एक जीवन आहे. कधीही न कळलेलं, कधीही न संपणारं अन कधीही न उलगडणार. झाकल्या मुठीत सर्व काही असणारं, मुठ उघडली असता काहीही नसणार. सुखाचं आवरणं असणारी दु:खाची ठेव. सुखाच्या मृगजळामागे धावणाऱ्या वेड्याचं एक केविलवाण जीवन......कधीही हाती न लागणारं. सुखाला अनेक चेहरे असतात पण दु:खाला मात्र एकाचं. क्षणापुरते का असेना सुखांत कशाचीही अपेक्षा नसते, दु:खात प्रेमाचा आधार हवा असतो, अन त्या आधारालाच जीवन हे नाव द्यावयाच असतं. खरंच किती सोप्या आहेत जीवनाच्या व्याख्या.......सुखदु:ख म्हणजे जीवन! पण ही सुखं आपल्याच पायदळी तुडवीत, दु:खाचं भलंमोठ ओझं आपल्या खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या माझ्यासारख्या भटक्याच्या जीवनाची व्याख्या काय? .......कधी कळलीच नाही. कळाले ते एवढेच की दु:खावर दु:ख उभं राहून जी माझ्यासारख्यांची व्यथा निर्माण होते ते म्हणजे वेड्याचं जगण! ..........की ज्याला जगण्याचाच आनंद लुटता येत नाही. वटवृक्षाच्या सावलीत दु:खाचा काळोख मोजणार माझ हे मन. समाधानाला तिलांजली देऊन दु:खाची आरती करणार हे मन. नैराश्यान पछाडलेलं हे बेफाम मन. तो माणूस दुसऱ्याला सुखं देणार? सुखासारख्या या गोड शब्दाचा हा अपमानच नाही का? .......तर अशा या मूर्खाच हे छोटस जीवन, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याऐवजी अंधारातून अंधारातच नेणारं. वाळवांटासारख्या ओसाड पहाडासारखे रुक्ष, पाण्याचा थेंब नसणाऱ्या नदीच्या पात्रासारख बकाल. पालवीचा मागमूसही नसणाऱ्या वृक्षासारख निस्तेज!
   
वि. स. खांडेकर लिहितात,
"भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाने मन केवळ साखरदंडानी करकचून बांधून ठेवू नये. त्याला भविष्याच्या गरुडपंखाचे वरदानही लाभले आहे. एखाद स्वप्न पाहण, ते फुलविण आणि ते सत्यसृष्ठीत उतरावं म्हणून धडपडण, त्या धडपडीचा आनंद लुटण आणि दुर्दैवानं ते भंग पावण.........तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामाग धावण हा मानवी मनाचा धर्म आहे".  

खंर आहे हे पण .......पण जीवनात घडलेल्या भग्न स्वप्नांना माणूस सहजासहजी विसरू शकतो? .......नाही.......नाही; त्या........त्या दु:खाची तीव्रताच इतकी असते की सुखांची शक्तीच कमी पडते. कारण सुखाला वाटेकरूच खूप असतात, दु:खात कोणी विचारीत नाहीत. अन त्या भग्न स्वप्नांनी रक्ताळलेल्या पायाच्या वेदना ह्या फक्त त्या तुकड्यावरून चालणाऱ्या माणसालाच समजू शकतात. तडा गेलेली काच पुन्हा जोडू शकत नसतो तसंच माणसाच्या मनाचंही असतं. कारण तडा गेलेल्या मनाला दुसऱ्यांचे अश्रूसुद्धा थोपवू शकत नाहीत. म्हणूनच माझ्यासारख्या माणसाला दु:खातच जगायचंय, दु:खातंच डुबायचंय, दु:खातंच बागडायचं असतं, दु:खातंच फुलायचं असतं. दु:खातंच राहायचं असतं..........

........फक्त.........फक्त सुखाच्या न दिसणाऱ्या मखमली आवरणाखाली!