इवलसं मनं
तन भी सुंदर मन भी सुंदर, तू सुंदरताकी मुरत है,
किसी और को शायद कम होगी, मुझे तेरी बहोत जरुरत है,
पहिले ही बहोत मै तरसा हुं, तू और न मुझको तरसाना.....
भोवताली हिरवीगार गर्द वनराई, निळे शुभ्र आकाश, नितळ पारदर्शक पाण्यानी नटलेला समुद्र अशा सुंदर, शांत, मनमोहक वातावरणात मानव जन्माला आला. शुद्ध, स्वच्छ मनानं जन्माला आलेला माणूस याहून वेगळा असणेच कठीण. बालपणातील या निसर्गाच्या वरदानान लाभलेल्या गोष्टी कालांतरान लुप्त पाऊ लागल्या माणसाचं मन दुसऱ्याच विकृत गोष्टीनी व्यापू लागलं. परमेश्वरानं माणसाला तन आणि मन दिल. उमलणाऱ्या फुलासारख्या या दोन गोष्टी दिल्या आणि या गोष्टींचा सदुपयोग करण्यासाठी दिली ती बुद्धी!....
पण, शेवटी माणूस तो माणूस! त्याला 'तन' आणि 'मन' यातला फरकच नाही कळला. तन आणि मन! दोन छोट्या-छोट्या अक्षरांचे दोन छोटे-छोटे शब्द. कुठेही काना, मात्रा, वेलांटी न सापडण्याइतके सरळ शब्द. किती भावना लपलेल्या आहेत या दोन छोट्या शब्दात. ज्याला या दोन शब्दातला फरक कळला, अर्थ समजला, वागायचे कसे याचे ज्ञात झाले त्यानेच आपल्या बुद्धीचा उपयोग केला असे म्हणावे लागेल. तन आणि मन याबरोबर परमेश्वरानं माणसाला बुद्धी दिली ती एवढ्यासाठीच की माणूस आणि पशु यामधील फरक हा माणसाला समजावा. पण बुद्धी न चालविणाऱ्या माणसाला तन काय आणि मन काय? अर्थ एकच!
तन आणि मन! एक दिसणारी अन दुसरी न दिसणारी. कुठली महान आणि कुठली लहान. माझ्यामते दोन्हीही महान. पण ज्याचा स्वतःच्या मनावर ताबा आहे तो माणूसच महान आणि अशा माणसाचा त्याचा शरीरावर त्याहूनही अधिक ताबा असतो. म्हणूनच माणसानं आपल्या मनाला आपल्या मुठीत ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याचं मन तडफडत असतं त्याचं कोणत्याच गोष्टीवर नियंत्रण नसतं. तो नुसताच वाऱ्याच्या प्रवाहानुसार वाहवत असतो. कारण त्यावेळी त्याची स्वतःची बुद्धीच गहाण पडलेली असते. म्हणून माणसानं आपल्या आयुष्यात स्वतःच्या मनावर, बुद्धीवर नियंत्रण ठेवावयास हवं. या शक्तीनं आपल्यावर नव्हे. मनावर ताबा असणारा माणूस असं कोणतंच विघटीत कार्य करू शकत नाही की जे त्याच्या मनाला पटत नाही. शरीर हे दिसणारं आहे, हाडामासान तयार झालेला तो एक सामान्य देह. शरीरावर कोणतीही झालेली जखम माणूस सहन करू शकतो पण मनाचं तसं नसतं. मनावर झालेला आघात तो कोणत्याच प्रकारे लपवू शकत नाही आणि मनाच्या खोल गाभाऱ्यात झालेली जखम तो सहजासहजी पुसूही शकत नाही. मन ते मन त्याच्या त्याच्या जखमांना औषध नसतं. असते ती फक्त एक नाजूक भावना आणि या नाजूक भावानावरच त्याचं हे मन जगत असतं. बुद्धीची साथ ज्यावेळी मनाला लाभते तेंव्हा त्याच्या मनाची व्याप्तीच वाढते. सागरासारखं अफाट असं त्याचं होतं. संकुचित वृत्तीच्या माणसांची मनही संकुचित असतात कारण संकुचित मनाला बुद्धीचं पाठबळ नसतं.
माणसानं मनावर प्रेम करावं की शरीरावर!
.......खरंतर मनावर. शरीराचा प्रत्येक अवयव मनाच्या मंदिरातूनच वाटचाल करीत असतो. मनात जर हलकल्लोळ माजलेला असेल तर सुदृढ शरीर सुद्धा साथ देत नाही. म्हणून मनाला सांभाळणे महत्वाचे. मनातील विचार हे अमृतासारखे गोड असावेत, दुधासारखे शुभ्र असावेत, पाण्यासारखे पारदर्शक असावेत आणि फुलासारखे कोमल असावेत. विचारांवर बंधन असू नये. विचाराला गती असावी, विचार पुढेपुढे सरकावयास हवेत. माणसानं मनावर प्रेम जरूर करावं पण याचा अर्थ असं नाहीय की त्यानं शरीराकडे दुर्लक्ष करावं. शेवटी तन आणि मन हेच माणसाचं व्यक्तिमत्व घडवीत असतं.
तन हे आपलंच आहे आणि मनही आपलंच आहे. तनही सुंदर आहे आणि मनही सुंदर आहे....पण.....पण......
मनानं शरीरावर नियंत्रण ठेवायचं असतं आणि बुद्धीनं मनावर ताबा मिळवायचा असतो. बस्स फक्त एवढंच आयुष्यात करावयाच असतं!
No comments:
Post a Comment