बंध रेशमाचे
ती संध्याकाळही अशीच होती. नदीवरून सायंवाराही असाच वाहत होता. .....अगदी असाच धुंद! मावळतीच्या सूर्याचे लालसर किरणही असेच सरितेच्या निळ्या शांत पाण्यावर लहरत लहरत चमकत होते. सूर्यबिंब काहीसं धूसर होत चाललं होतं. पाखरांचे थवे आपल्या घरट्याकडे परतत होते. आजच्यासारखे सुगंधित वाऱ्याच्या लहरीबरोबर लहरत येणारे गाण्याचे सूर पसरत होते. दूरवर कुणीतरी गात होतं......
"शुक्रतारा मंदवारा, चांदणे ओठात या"
सारं काही तसंच......हो, अगदी तस्सच! आजही सारं तसंच आहे......पण माझं मन मात्र त्यावेळी सारखं फुललेलं आनंदी का नाही बरं? ते आज एवढ अस्वस्थ काहीसं उदास का बरं वाटतंय? ज्या वातावरणात मी एकेकाळी उल्हासित व्हायचा, तिथंच मी आज उदासीन का? मधुर गुजारव करत येणाऱ्या लाटा आज भीषण काळलाटासारख्या का बरं भासताहेत? पाखरांच्या त्या किलबिलाटात मी तासनतास स्वत:ला विसरून जात होतो तीच किलबिल मला आज अर्थहीन कर्कश का वाटतेय? ज्या सुरांवर मी लाटांप्रमाणे तरंगत होतो, ते सूर आज कुठाहेत? सारं काही तेथेच असूनसुद्धा काही नसल्यासारखं का वाटतंय? का मला याचा त्रास होतोय? का हेच सत्य आहे? कदाचित तो माझ्या मनाचा गोंधळ असू शकेल.......
मला माहित आहे, ठावूकही आहे.......हे सारं अखेर सत्यच आहे. कितीही खोटं म्हटलं तरी ते सत्यच आहे..... मला त्याची कारणंही ठावूक आहेत.... ती ......होय, तीच आहे याच, या उदासीनतेच कारण!
पण तुम्हाला ती माहित नाहीय! तसं पाहिलं तर मला तरी कुठं ती माहित होती? जीवनाच्या प्रवाहात खूपजण भेटतात, तशीच तीही भेटली होती. कुठे भेटली, कशी भेटली अन केंव्हा भेटली या प्रश्नांना काहीही अर्थ नाही. पण जीवनाला खरा अर्थ आला तो ती भेटल्यानंतरच!
'जीवनगाणे' गात फिरणाऱ्या एका भटक्याला सूर अन स्वर सापडला! जिंदगीचा नूर गवसला तो त्या पहिल्या भेटीतच! नदीच्या पात्रात दगड भिरकवल्यानंतर उठणाऱ्या तरंगाप्रमाणे माझ्या जीवनात नवे खुषीचे तरंग उठले ते ती भेटल्यानंतरच!
कधी तिच्या गालावरची गुलाबी छटा चोरून संध्याकाळ विश्वाला मोहवायची तर कधी तिच्या काळ्याभोर कुरळ्या केसांच्या वाऱ्यावर उडणाऱ्या बटाप्रमाणे अंधार सभोवताली पसरत जायचा. तिच्या पायातील पैजणांच्या नादावर ताल धरीत पाखरं भुर्रकन उडत घरी परतायची. तिच्या गोऱ्यापान भव्य कपाळावरची कुंकवाची गोल कोर नदीच्या शांत निळ्या पाण्यात पडलेल्या लालभडक सूर्यबिंबाच्या प्रतिबिंबाशी स्पर्धा करायची. मावळतीचे किरण तिच्या गालावरची गुलाबी छटा अधिकच उठावदार गडद करायचे तर तिच्या मिटलेल्या पापण्यांची अर्धचंद्राकृती नुकत्याच उमललेल्या चंद्रकोरीशी नाते सांगायची अन तिचे डोळे .......त्यांना पाहून तिला कमलनयना म्हणावं की मृगनयना म्हणावं याचाच मला प्रश्न पडायचा.
.......पण ! पण ते आठवून आता काय उपयोग? माझ्या पायात चुकून काठावरचा एखादा खडा रुतला तर जिच्या डोळ्यातं चटकन पाणी यायचं तिला माझ्या हृदयात घाव घालताना काहीच वाटलं नाही? जिथं मनच आता रक्तबंबाळ झालंय, तिथं पायाची काय कथा? माझ्या कपाळावर रुळणाऱ्या बटांना मागं सारणारे तिचे हात माझ्या जीवनावर काळेकभिन्न सावट आणू शकतात हे अनुभवाने पटलं.
ती आता कोठे आहे कोणास ठावूक! ती पुन्हा भेटेल अन तिला या विश्वसद्याताचा जाब विचारावा या एका जाणीवेपायी तळमळतोय! आठवतंय......एकदा म्हणाली होती, तुझ्याशिवाय मी जगूच शकणार नाही "कृष्णाविना राधा जर राहूच शकत नसेल, तर तुझ्याविना मी कशी जगेन?".......
हो मला आठवतंय! मी त्याला एकदा म्हणाले होते....तुझ्याविना मी जगूच शकणार नाही जशी कृष्णाविना राधा........! पण .........! त्याला तोडून त्याच्या जीवनातून अखेर बाजूला व्हावंच लागलं. सारीपाटाचा डाव मांडून तो मोडावाच लागला. त्याला वाटत असेल अखेर तीही विश्वासघातकीच निघाली कदाचित नदीच्या तीरावर त्या ठिकाणी तोही जुन्या आठवणीना उजाळा देत बसला असेल. पण मी विश्वासघातकी नव्हते. मी तुला फसविलं नाही रे! कसं सांगू? खूप खूप सांगायचं पण सांगता येत नाही.........!
.........त्याला वाटेल माझं त्याच्यावर प्रेमच नव्हतं, सारं काही नाटकंच होतं पण सत्य त्याला कधीच कळालं नाही ........अन ते त्याला कधीच कळणार नाही. त्यादिवशी त्याला तशीच सोडून आले काहीही न कळविता! अन तेंव्हापासून मीही अशी जळते आहे.
ती नदी ती सुहानी शाम! सारं काही आता विसरून जायचंय ! पण विसरून जायचं म्हटलं तरी ते कसं शक्य आहे? ते का वाळूचे किल्ले आहेत - पाहिजे तेंव्हा बनवायला अन मन मानेल तेंव्हा मोडायला ! मला माहित आहे, तो अजूनसुद्धा जळत असेल, कुडत असेल पण......! पण मी काय करू शकणार होते? त्याची स्वप्नं पूर्ण करणं मला कसं शक्य होतं! त्याची स्वप्नं फुलवून तोडण्यापेक्षा मला विश्वासघातकी समजून जाणं हेच श्रेयस्कर होतं. मी त्याला कसं सांगू शकत होते की मी........मी........मी.......मी फक्त थोड्याच दिवसांची सोबती आहे म्हणून! .......की मी कैन्सरसारख्या असाध्य रोगाची बळी आहे म्हणून ! अन त्याचं उमलत जीवन माझ्यासुखासाठी स्वास्थ्यासाठी बरबाद करण्याचा कोणता हक्क मला होता?
........वेडे ! किती मोठी चूक केलीस? तू मला एवढ्या सहवासानंतर सुद्धा समजू शकली नाहीस! हीच का माझ्या प्रेमाची पारख केलीस? माझ्यासाठी एवढा मोठा त्याग केलास, मलाही त्यात वाटेकरी का नाही करून घेतलंस? अगं प्रेम म्हणजे नुसतं सुखाच्या, आनंदाच्या क्षणात वाटेकरी होणं नव्हे. दुःखाचे पर्वत देखील जोडीनं पार करणं म्हणजे प्रेम! विषाचे घोट पाचवीत पुढे जाणं म्हणजे प्रेम! काळलाटांच्या घनघोर प्रलयात आपलं शीड जोडीनं पुढं हाकण म्हणजे प्रेम! प्रीतीचे बंध रेशमाचे जरूर असतील पण महाप्रलयात काळरात्रीही न तुटण्याइतके ते मजबूतही असतात. पण.......! पण आता काय त्याच..........? तू गेलीस .......... जाताना मला रेशमी चिवट दोरान जखडून!
Beautiful
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete