Sunday, December 12, 2010

'ती आणि तिचा मी'



आज बऱ्याच दिवसानंतर कोरा करकरीत कागद आणि शाईनं भरलेलं पेन हातामध्ये होते. पण काय लिहावयाचे हेच कळत नाहीय. कळत नाही म्हणण्यापेक्षा विषय मिळत नाही, आज शब्दांना पुढे सरकावेसे वाटत नाही, शब्दाविण वाक्य पूर्ण होत नाहीत आणि त्यांना दिशाही मिळत नाहीय. माझ्या मनामध्ये आज विचारांची इतकी गुंतागुंत आणि गर्दी झालीय की मी मलाच हरवून बसलोय. आज कुठे हरविल्यात या सर्व गोष्टी? का थांबलेय माझी लेखणी? खरंच का मी सर्व काही विसरलोय? खरंच का मला आज काहीही आठवत नाहीय? का मन अस बेचैन होतंय?.....नाही.....नाही मला.....नाही कळत......तू सांगशिल?  

.....नाही, नाही, तू काहीच नाही विसरलास आणि हो विसरशील तर कसे? कशा विसरशील तू सगळ्या आठवणी? कशी विसरशील तू सुखदु:खाची तुझीच कहाणी? कसे विसरशील तू तिला आणि कसे विसरशील ते नाजूक जोपासलेले क्षण?

....खरंय तुझे! बाल्यावस्थातील निरागसता संपली, कुमारवयातील आकर्षण संपले, तरुणाईचा जोश ओसरत चालला म्हणून थोड्याच आठवणी पुसल्या जाणार? आठवणी त्या आठवणी, मग त्या सुखद असोद वा दु:खद...त्या आठवणारच.....म्हणूनच दोन दशकामागे घडलेल्या गोष्टी एखादा चित्रपट पुढे सरकावा तसा आज माझ्या डोळ्यासमोरून सरकतो आहे. फरक आहे तो कृष्णधवल ते रंगीत चित्रफितींचा. 

आठवतात मला 'ते' दिवस. आठवतात 'त्या' आठवणी. आठवतो तो तिचा बाल्यावस्थातील निरागस चेहरा. आठवतंय ते अल्लड आणि नटखट वागण आणि आठवतोय तो डोळ्यातील निष्पाप भाव! आठवतात त्या शेजारी बसून मारलेल्या गप्पा..... आठवते 'ते' तुझं बघणं!....आठवते ते घर...आठवतात त्या जिन्याच्या पायऱ्या आणि आठवतो तो तुझ्या नाजूक पायांचा होणारा मंजुळ आवाज! आठवते ती तुझी खोली.....आठवते ती पहाट आणि आठवतो तो चहाचा कप!.....आठवतेय 'धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना'...'अजून आठवे ती...', आठवते ती जगजीत-चित्राची तुझी आवडती गझल.....आणि आठवतात ती 'आठवणीतली सर्व गाणी'! 

तुला माहित आहे?.....एखादं कमळ पकडायचं म्हणून भुंगा भ्रमण करीत नसतो आणि भुंग्यान आपल्याकडे पहावं म्हणून कमळ फुलत नसतं. फुलणं हा कमळाचा धर्म असतो आणि भुलणं हा भुंग्याचा स्वभाव असतो. म्हणूनच आपण कमळाकडे आणि भुंग्याकडे बघून 'फुलावं कसं आणि भुलाव कसं' हेच शिकावं. आणि हे शिकत असतानाच कमळ फुलतं होतं आणि भुंगा भुलत होता. कमळाला कळत नव्हतं की भुंगा आपल्यासाठी भ्रमण करतोय आणि भुंग्याला उमजत नव्हतं की कमळ आपल्यासाठी फुलत नाहीय. कमळ कधी फुलून आलं आणि निघून गेलं हे भुंग्याला कळलंच नाही.....
भुंगा मात्र वेड्यासारखा भ्रमण करीत राहिला कमळासाठी! 


माणसानं एकदातरी समुद्रकिनारी जावं आणि अनुभावावित 'ती सुखदु:ख' ! वाळूचे आपण मनोरे बांधावेत, घरटीही बांधावित आणि अचानक एका लाटेनं ते उध्वस्त करावेत. पुन्हा जोमानं आपण ते बांधण्याकरिता धडपडावे आणि वेड्या आशेनं ते पूर्ण होईल अशी वेडी स्वप्नं पहावित......पण पुन्हा तीच लाट....आणि पुन्हा तेच भंग पावलेलं अधुरं स्वप्न! .... लाटेला कळत नसतं की आपण कुणाचीतरी स्वप्न उध्वस्त करतोय आणि घरट बांधणा-याला  कळत नसतं की स्वप्न साकार होणं आणि भंग पावणं यामध्ये फक्त चार पावलांच अंतर असतं!....हा डाव अर्ध्यावरती मोडत असतो तरीही आपण हा भातुकलीचा खेळ खेळतच असतो......तिच्यासह.....!     



जाऊदे, आज काही चिंचा गोळा करायच्या नाहीत की म्हातारीचे उडणारे केस पकडायचे नाहीत, आईस्क्रीमच्या लाल गोळ्याची ओढ नाही की पतंगामागे धावायचेही नाही. लगोरी नाही की विटीदांडू नाही.....आहेत त्या फक्त आणि फक्त 'आठवणी'..........तू म्हणालीस, तो भूतकाळ आहे 'विसर' ! पण भूतकाळ असा थोडाच विसरला जातो?...

माणूस जगतो तोच मुळी भूतकाळावर! जोपर्यंत त्याच 'मन' जिवंत आहे तोपर्यंत तो भूतकाळातील आठवणी आठवत असतो. आठवणी या सुखदही असतात आणि दु:खदही! सुखद आठवणीना कवटाळून आपण पुढचा प्रवास करावयाचा असतो आणि दु:खद आठवणी म्हणजे मनातील साठलेली जळमट.....कधीतरी साफ ही करायचीच असतात. भूतकाळ मला आज असाच मुद्दाम आठवावा लागला......न विसरलेल्या आठवणी पुन्हा नव्यानं जाग्या करायच्या होत्या......

.....कोरा करकरीत कागद आणि भरलेलं शाईचं पेन शब्दांची वाट पहात होते. पण शब्द थांबले होते, त्यांना दिशा मिळत नव्हती...कारण आज मनावर विचारांचं संपूर्ण वर्चस्व होतं आणि या विचारात होती फक्त 'ती आणि तिचा मी'!
                                
 .....सखी, बघ तुलाही आठवतोय का........'मी आणि माझी तू' ! 

No comments:

Post a Comment