अजून आठवे 'ती'...
ती अशीच एक संध्याकाळ होती, अशीच म्हणजे रोजच्यासारखी शांत ! बागेतील हिरव्यागार गवतावर पहुडलो होतो. वाऱ्याची झुळूक थंडीचा गारवा सांगत होती, ऊन अन सावलीचा लपंडाव तर सुरूच होता. 'सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का?'.....असे फडके आपल्या हळुवार आवाजात गात होते. शेजारील गरम चहाचा कप थंडीचे अस्तित्व नाहीसे करण्यासाठी धडपडत होता. समोरील वृक्षांवर राघू-मैनेची काहीतरी हितगुज चालली होती. माझी नजर नकळत त्या दोघांवर स्थिरावली अन मी माझे मलाच विसरून गेलो. शरीरान मी गवतावर होतो परंतु मनानं मी केंव्हाच दूरवर जावून पोहोचलो होतो. माझ्या मनावर आता विचारांचं पूर्ण नियंत्रण होतं. माझ्या मेंदूची चक्रे अतिशय वेगानं फिरत होती. माझ्या मनात 'ती' होती, माझ्या विचारात 'ती' होती, माझ्या भोवती 'ती' होती आणि माझ्या नजरेतही 'तीच' होती. मला आता कशाचेही भान राहिले नव्हते. शेजारील कुठल्याही अस्तित्वाची जाण राहिली नव्हती, माझं माझ्तावर नियंत्रण नव्हत. मी माझा राहिलेलो नव्हतो, 'तिचं' माझ्यावर नियंत्रण होतं. माझा चेहरा स्थिर आणि गंभीर असावा म्हणूनच पक्षांनीही आपली किलबिल आता थांबविली होती. समुद्राच्या खळखळणाऱ्या लाटा आज माझ्या मनांमध्ये थैमान करीत होत्या. मनामध्ये विचारांची आज जणू भरतीच आली होती. मी गंभीर होत होतो; माझं हास्य कुठतरी लुप्त पावलं होतं. मी तिच्या कालचक्रात पूर्णपणे गुरफटलेलो होतो. मला फक्त 'ती' हवी होती......फक्त 'ती'! तिच्या शिवाय माझं जीवन म्हणजे हृदयविना शरीर अस माझं मन माझ्या हृदयाला समजावीत होतं. तिचं माझ्यापासून क्षणभरासाठी दुरावण हे सुद्धा मला आता असहाय्य होत होतं. तिच्या प्रेमाच्या सावलीत अन मायेच्या आधारात राहण्यासाठी मी धडपडत होतो.
अचानक माझ्या चेहऱ्यावर दव जमू लागल्याचे मला जाणवू लागले अन मी हलकेच माझे डोळे बाजूला फिरविले.....तर.....तर.....ते दव नव्हते,.....तर.....'ती' माझ्या शेजारी अश्रू ढाळीत बसली होती. तिचा मायेचा हात माझा चेहरा गोंजारीत होता, तिला मला काहीतरी सांगावयाचे होते पण शब्द फुटत नव्हते. 'ती' नुसतेच आपल्या नयनांनी सांगावयाचा प्रयत्न करीत होती पण तिचा स्पर्श बरंच काही सांगून जात होता. 'तिच्या' दु:खाची तीव्रता ही माझ्या दु:खापेक्षा कितीतरी जास्त होती तरी 'ती' आज मला समजावून घेण्याचा अन समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होती. माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू जमा झाले होते, आणि मी लहान मुलासारखा तिच्या कुशीत रडत होतो, माझ्यासाठी, माझ्या अश्रुसाठी 'ती' हुंदके देत होती. मी रडत होतो ते जीवन कस जगावं हे न समजल्यामुळे अन ती हुंदके देत होती ते तिला बालवयात झालेल्या वेदनांसाठी !
सूर्य अस्ताला चालला होता, राघू-मैनेची आपापल्या घरट्यांकडे जाण्याची धडपड चालली होती....आम्ही मात्र तसेच स्तब्ध होतो, निरभ्र आकाशाकडे बघत अन लखलखणाऱ्या चांदण्याच्या शोधात......उरलेल्या आयुष्यातील सुखाचे क्षण मिळविण्यासाठी आणि एकमेकांना देण्यासाठी....
........शेजारील थंडगार चहाच्या कपात दुधाची साय वाऱ्यासोबत तरंगत होती आणि कुठेतरी..... कुणीतरी...गात होतं .......
'.........तू अशी जवळी रहा!'
No comments:
Post a Comment