"अशी पाखरे येती....."
"अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगत-सांगत, दोन दिसांची नाती."
खरंतर मी हे काव्य फारसे ऐकत नाही. ऐकत नाही म्हणजे भावनांच्या बांधिलकीन मन असहाय्य होत म्हणून. पहाटेच्या आरंभीच हे शब्द कानावर पडले आणि मन बेचैन होऊ लागले. तसं पाहिलं तर हे काव्य अंतकरणाला भिडणारं आहे. भावनांच्या चक्रव्युहात शब्द व सूर गुंतलेले पूर्णपणे जाणवतेय म्हणूनच ज्याज्यावेळी मी हे शब्द ऐकतोय त्यात्यावेळी माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहतात. हृदयापासून आलेल्या भावनांना माणूस रोखू शकत नाही हेच खरे.
तू म्हणालीस, रक्तापेक्षा या जगात अश्रूच जास्त पवित्र असतात.कारण तू ते अनुभवलयस......खरंच आहे हे. रक्तात संकर होऊ शकतात पण अश्रू निर्मळ गंगा आहे. रक्ताची नाती तुटू शकतात. पण अश्रुंच नातं तुटत नाही म्हणूनच मी सुद्धा रक्तापेक्षा अश्रुंनाच जास्त महत्व देतो.
जाणाऱ्या माणसाला आपण कधीच रोखू शकत नसतो. परंतु त्या माणसाबद्दल आपल्याला प्रेम का बरं असावं? आपण ज्याच्याकडे अभिमानानं, आदरानं पाहतो अशी माणस आपल्या आयुष्यात क्षणभरासाठी का म्हणून येतात? आणि का म्हणून आपण त्यांच्याकडे आकर्षिले जातो? खरंच या प्रश्नांना काहीही उत्तरे नाहीत. म्हणतात ना माणूस जसा नेहमी एकता असतो तसे त्याचे मनही! आणि शेवटी आपल मन हे आपणच मरावयाचे असते. आपल्या विरुध्द तक्रार घेवून ते कोठेही जात नाही, कोठेही बोलू शकत नाही. परंतु ज्या माणसाचं 'दिल' कुठेतरी जिवंत आहे, त्या माणसाला ह्या सर्व गोष्टींबद्दलच प्रेम असतं. आणि प्रेम निर्माण व्हावयास आकर्षणाची जरुरी नसते तर सहवासाची गरज असते. जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त म्हणून तितकीच आपुलकीही जास्त!
कुठतरी मी वाचलं होतं की माणसानं एकदा जीवन हे जगण्यासाठी आहे हे मान्य केलं की, ते जीवन जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे जगावं. पण चांगले जगण्यासाठी पैसाच हवा असतो असे नाही.......हवा असतो मनाचा उमदेपणा, हवी असते रसिकता!
तुला माहित आहे, जीवन कसं असावं? तर ते जंगलातून अवखळपणे वाहत जाणाऱ्या झऱ्याप्रमाणे असावे - प्रवाही, नितळ, पारदर्शक!
जाता जाता तुला एवढेच म्हणावेसे वाटतेय,
"कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी,
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजूनही गाती"
No comments:
Post a Comment