Sunday, October 31, 2010

स्वप्न ! 


ती एक अपूर्व संध्याकाळ होती. खरंच अपूर्व एवढ्यासाठीच म्हणावयास हवे की त्या संध्याकाळणे मला जगण्यासाठी एक नवीन दिशा दाखविली. संध्याकाळच्या त्या निसर्गरम्य वातावरणात एकीकडे तो तांबूस रंगाचा सूर्य अस्ताला जात असतानाच दुसरीकडून ती आपल्या नाजूक पावलांनी जमिनीवरील धूळ उधळीत, शरीराला लचके देत येत होती. जलतरंगवरील जसे निरनिराळे स्वर यावेत तसे तीच्या पायातील पैंजणाचे मंजूळ स्वर हवेमध्ये एक वेगळाच आभास निर्माण करीन होते. वसंत ऋतूत ज्याप्रमाणे झाडांना पालवी फुटू लागते तद्वतच तीला पाहताच मनामध्ये एक प्रकारची नवीन जागृती निर्माण होत होती. जणूकाही परमेश्वराने नयन हे फक्त तिचे सौंदर्य टिपून घेण्यासाठीच दिलेले आहे असे वाटत होते अन तिला स्वर्गातून या पृथ्वीतलावर फक्त ...फक्त माझ्यासाठीच पाठविली आहे.

ती आली, तिला पहिले आणि त्याचवेळी कळाले कि आयुष्य हे जगण्यासाठीच आहे. सभोवतालचा बहरलेला परिसर तीच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. वृक्षांवरील नाजूक कळ्या उमलण्यासाठी धडपडत होत्या, कोकिळेची गोड शिळ मनाला उत्तेजित करीत होती. मोर आपला पिसारा फुलवून आनंद आणखीनच वाढवित होता. समुद्राच्या खळखळणाऱ्या लाटा जीवनाचे ध्येय समजावत होत्या. मी हलकेच हात पुढे करून तिचा चेहरा माझ्या हातामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला, तिला पुसटसा स्पर्श झाला अन ... अन शरीरातून एक हलकीच लकीर निघून गेली. तीने आपला चेहरा हळूच माझ्या खांद्यावर ठेवला आणि त्याक्षणी मला माझ्या कर्तव्याची पूर्ण जाणीव झाली. जोडीदाराच्या सहकार्याची कल्पना येत होती. 'जीवन हे गाणे गातच रहावे'  असे गाणा-याची सारखी आठवण येत होती. माझ्या बाहूपाशात सामावलेली ती मला आपल्या जीवनाचं मर्म सांगत होती. निश्चयी चेहरा, नजरेतील प्रेमाची ओढ, सातजन्माचा ऋणानुबंध सांगण्यासाठी मला हलकेच बांधून ठेवणारा तीचा रेशमी केशभंगार  मला अधिकच सुखावत होता. तिच्या हातातील बांगड्यांचा आवाज सप्तसुरांची आठवण करून देत होता.  

...पारिजातकाच्या वृक्षाखालील ते दृश्य मनमोहक असंच होत. पारिजातकाला  ती रेलून बसली होती अन तीच्या मांडीवर मी हलकेच विसावलेलो होतो. तीचा हात माझा चेहरा गोंजारीत होता. शुभ्र पारिजातकाची फुले हळूवारपणे आमच्या शरीरावर आपले आवरण चढवित होती. आज खरंच तीचा चेहरा खूप फुलाला होता. कशाचीही चिंता, काळजी तीच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. तू आणि मी हीच भावना तिच्यामध्ये आज दिसत होती. मुक्यानेच सर्व काही गोष्टींची किलबिल चालू होती. शब्दांच अस्तित्व आता राहिलंच नव्हत. शब्दांची जागा आता नजरेन आणि स्पर्शान घेतली होती. ही दुनिया आता चार लोचनांच्या दोन पाखरांसाठीच होती. समुद्राच्या माग सूर्य ढगाआड होत होता अन मी हलकेच माझे ओठ तीच्या कपाळावर टेकविले आणि ....आणि एवढ्यात 

......एवढ्यात घंटेचा आवाज ऐकू आला, मी दार उघडले अन दारात दूधवाला उभा होता आणि...आणि...
                                                                                                                                                               ....... समोर सूर्याची किरणे डोकावित होती!              

No comments:

Post a Comment