स्वप्नातल्या कळयांनो...
बऱ्याच दिवसानंतर आज आपण पुन्हा भेटत होतो. रस्ता तसा गजबजलेला नव्हता. चार एक माणसे इकडे तिकडे फिरत होती. बाकी सर्वत्र शुकशुकाटच होता. तू भेटणार म्हणून मन आज खूप प्रसन्न होते. पावसाची वाट पाहणाऱ्या आणि त्यामध्ये बेधुंद होण्यासाठी जगणाऱ्या वनवेलीप्रमाणे ते आज तुझ्यासाठी आतुरलेलं होत. तू आलीस, बराच वेळ आपण चालत होतो. मुक्यानेच संभाषण होत होत. बोलावयास सुरुवात करावयाची म्हणून ओठ हलविले आणि तेथेच चुकलो. तसं काही बोलायचं नाही असं हजारदा ठरवितो, पण जेंव्हा जेंव्हा तू समोर दिसातीस तेंव्हा तीच वाक्यं माझ्या जिभेवर नाचावयास लागतात. सगळ्या चुका माहित असूनही पुन्हा पुन्हा त्या करावयाशा वाटतात. तू चिडणार, वैतागणार, ह्याची कल्पना असूनही पुन्हा तेच शब्द माझ्या भोवती घिरट्या घालू लागतात. तुला त्रास द्यावयाचा नसतो आणि एकमेकांच्या जखमेवरील खपल्या काढण्याचा अट्ट|हासही नसतो, पण नकळत हे घडतं, तू चिडतेस अन माझा विरस होतो, सूर बेसूर व्हावयास लागतात, रंगाचा बेरंग होतो.
संसारात दोन माणसांचा स्वभाव एक असण तसं कठीणच असत. कुणीतरी कुणासाठी म्हण किंवा दोघांनीही एकमेकांसाठी म्हण बदलायला हवंच असतं, कारण भांड्याला भांड लागलं म्हणजे आवाज हा होणारंच, म्हणून भांड्याला भांड लागू न देण हेच आपल्या संसाराचं ध्येय असलं पाहिजे.
तू म्हणालीस,.......तू बदल,
मी म्हणालो, हो!
तू म्हणालीस, तू स्मितमुखी रहा,
मी म्हणालो हो!
भावानाधीन होवून चालत नाही, या जगात तू व्यवहारी आणि विवेकी रहा....असाही तू म्हणालीस.
मला स्वतःला हे पटत ग पण....पण भावनाप्रधान माणसाला ते कस शक्य आहे? मला तुझ्याकडून कशाचाही नकार ऐकावयाचा नसतो. एखादी ठेच सुद्धा माझे जीवन उध्वस्त करू शकते. मला दु:खात राहावयाच नसतं ग पण.....पण.....दु:खच मला विचार करावयास लावत आणि मग मी माझ्याच विचारात डुबून जातो. विचारी माणसाला अविचार चालत नसतो, शब्दात अपशब्द चालत नसतो, अपेक्षात उपेक्षा नको असते म्हणूनच होकारात नकार नको असतो!
जे मी आख्या दुनियेत फक्त तुझ्यासमोर बोलू शकतो, आणि म्हणून तुझ्या भेटीची चातकासारखी वाट पाहत असतो. माझ्या प्रत्येक हालचालीत तू असतीस, तू सगळ पाहत असतीस, प्रत्यक्ष दिलासा जरी देऊ शकत नसलीस तरी सुखदु:खात तू सहभागी आहेस असं सतत मला वाटत असतं.
तुझ्याबद्दल एवढी ओढ असूनही तुझ्याजवळ कितीही मोकळ व्हायचं असं ठरविलं तरीही मी मोकळा होऊ शकत नाही. भेट होवूनही मनाला शांती मिळू शकत नाही. कुणीतरी कुठतरी चुकत असतं एवढ मात्र नक्की. म्हणूनच मला स्वप्नातच राहावयास खूप आवडतं; तसं माझं जीवनावर नितांत प्रेम आहे. पण जीवन हे माझ्या मालकीचं नाहीय. त्याच्यावर आणखी कुणाचातरी हक्क आहे. स्वप्नाचं मात्र तसं नाही. मला हव्या त्या गोष्टी त्याच्यामध्ये घडू शकतात. कुणाच बंधन नसतं, कुणाची भीती नसते, प्रतिष्ठेचा, समाजाचा प्रश्न नसतो. भूतकाळातील रम्य आठवणीवरच माणूस जगात असतो.
मी हे सर्व स्वप्नातच लिहितोय कारण स्वप्नातून बाहेर आल्यानंतर ह्या व्यवहारी जगात काहीही नसतं. भावनांना किमंत शून्य असते. असते ती फक्त स्वप्नांची धूंदी. स्वप्नांत मन मानेल तसं होत असतं, तेथे प्रश्न नसतात, अडचणी नसतात कि दु:ख नसतं. पण प्रत्यक्ष जीवनात ते शक्य नसतं, त्याला व्यवहारी रहावच लागतं. तू म्हणतेस ते खर आहे कि माणसान विवेकी आणि व्यवहारी असावं. भावना, आवेग ह्यातलं काहीही या जगात मदतीला धावून येत नाही की सहाय्य करत नाही. म्हणूनच आपण म्हणावं,
'स्वप्नातल्या कळयांनो उमलू नकात केंव्हा......
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा..........'
No comments:
Post a Comment