'कर्तव्य आणि भावना'
कर्तव्य श्रेष्ठ की भावना? दोन शब्द वेगळे पण एकमेकांच्या बरोबरीने राहणारे. तुलना कशी करायची अन श्रेष्ठता कशात मोजायची? कशाला आनंद द्यावयाचा अन कोणाला दुखवायचं? कुणाला कळसावर चढवायचं आणि कुणाला पायदळी तुडवायच? तरीही श्रेष्ठता कशात समजायची? कर्तव्यात की भावनेत?
माझ्या मताला फारशी किमंत नाही. परंतु माझं मत ते शेवटी माझंच त्यावर दुसऱ्याचा अधिकार असण्याची आवश्यकता नाहीय आणि ते दुसऱ्याला पटेल अशातलाही भाग नाही. माणूस जन्माला आलेला आहे तो काहीतरी करून दाखविण्यासाठीच. कर्तव्य हीच त्याची पहिली पायरी आहे. कर्तव्याची जाणं त्याला असावीच लागते. 'मरावे परी कीर्तिरूपे उरावे' असे म्हटलेच आहे. आपल्या कार्याने आपल्या अस्तित्वाची जाणं माणसान ठेवावी हाच त्यामागील उद्देश आहे. कर्तव्याला पायदळी तुडवून माणूस पुढे जाऊच शकत नाही. 'कर्तव्याने घडतो माणूस'.....असंही कुणीतरी म्हटलंय. किती सार्थ आहे हे वाक्य. माणसाला ओळखलं जात ते त्याच्या कर्तव्याने, मग ते सत्कृत असो वा दुष्यकृत्य, कर्तव्यातील प्रत्येक कृतीला महत्व असतं. कशी कृती केली जाते यावर त्याचं कर्तव्य अवलंबून असतं आणि या प्रत्येक कृतीमाग एक नाजूक गोष्ट लपलेली असते की ज्यामुळे कर्तव्याच्या प्रत्येक कृतीला वेगळीच धार येते अन ती म्हणजे.......ती म्हणजे माणसाच्या अंतर्मनातील भावना.
भावनेचा जन्मच माणसाबरोबर झाला. स्त्री - मायेचा उगम असणारी एक निर्मळ गंगा. माया आणि प्रेम ही एक अफाट संपत्ती ईश्वरान स्त्रीला दिलेली आहे. म्हणूनच माणसाला उपजतच भावनेचा स्पर्श व्हावा म्हणून परमेश्वरान त्याला स्त्रीच्या पोटी जन्माला घातलं. परस्परांबद्दल प्रेमं वाटावं म्हणूनच माणसाच्या हृदयात एक नाजूक अविष्कार निर्माण केला आणि त्यालाच आपण भावना असं नाव देवून टाकलं. उत्कट भावना निर्माण व्हावयास एक जिवंत हृदयाची आवश्यकता असते. कारण भावनेचा उगमच हृदय आहे. जर हृदयच जिवंत नसेल तर भावना कोठून येणार? आणि जर भावनाच नसतील तर कर्तव्याला जोड कशाची मिळणार? भावना ही एक नाजूक गोष्ट आहे की मनाच्या देऊळातील हृदयाच्या गाभाऱ्यात जपलेली असते. म्हणूनच भावनेला तडा जाऊ न देण आणि कर्तव्याला पांगळ न पाडण हेच माणसाच्या हाती असतं. कारण भावनेचा अंत हा माणसाचा मृत्यूही ठरू शकतो. भावनारहित हृदय म्हणजे हृदयरहित शरीरच होय. म्हणूनच भावनेला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपावे लागते.
कर्तव्य श्रेष्ठ की भावना श्रेष्ठ? .........हा प्रश्नच गौण ठरतो. कर्तव्य आणि भावना ह्या तराजूच्या दोन पारड्या आहेत. त्यांची एकमेकाशी तुलनाच होऊ शकत नाही. या दोन्ही गोष्टींना आपला तोल हा सांभाळावाच लागतो. भावनारहित कर्तव्य आणि कर्तव्यविना भावना कधीच सुखं देऊ शकत नाहीत. म्हणूनच मला वाटत की कर्तव्य आणि भावना ह्याचं नात हे दुसरे-तिसरे काहीही नसून पती-पत्नीचं आहे. पती हे 'कर्तव्य' असून पत्नी ही त्याची 'भावना' आहे. आणि जर सुखांची फळे चाखावयाची असतील तर भावनेला कर्तव्याच्या माग सावलीप्रमाणे रहावेच लागते. हृदयातून उत्कटलेल्या भावनांना माणूस रोकु शकत नाही आणि त्याच्या हातून कृती घडते, घडलेल्या कृतीतून कर्तव्याची जाणीव होते आणि ह्याच जाणीवेतून पूर्णत्व प्राप्त होत.
No comments:
Post a Comment