Sunday, October 30, 2011


बंध रेशमाचे 




ती संध्याकाळही अशीच होती. नदीवरून सायंवाराही असाच वाहत होता. .....अगदी असाच धुंद! मावळतीच्या सूर्याचे लालसर किरणही असेच सरितेच्या निळ्या शांत पाण्यावर लहरत लहरत चमकत होते. सूर्यबिंब काहीसं धूसर होत चाललं होतं. पाखरांचे थवे आपल्या घरट्याकडे परतत होते. आजच्यासारखे सुगंधित वाऱ्याच्या लहरीबरोबर लहरत येणारे गाण्याचे सूर पसरत होते. दूरवर कुणीतरी गात होतं......

"शुक्रतारा मंदवारा, चांदणे ओठात या"     
  
सारं काही तसंच......हो, अगदी तस्सच! आजही सारं तसंच आहे......पण माझं मन मात्र त्यावेळी सारखं फुललेलं आनंदी का नाही बरं?  ते आज एवढ अस्वस्थ काहीसं उदास का बरं वाटतंय? ज्या वातावरणात मी एकेकाळी उल्हासित व्हायचा, तिथंच मी आज उदासीन का? मधुर गुजारव करत येणाऱ्या लाटा आज भीषण काळलाटासारख्या का बरं भासताहेत? पाखरांच्या त्या किलबिलाटात मी तासनतास स्वत:ला विसरून जात होतो तीच किलबिल मला आज अर्थहीन कर्कश का वाटतेय? ज्या सुरांवर मी लाटांप्रमाणे तरंगत होतो, ते सूर आज कुठाहेत? सारं काही  तेथेच असूनसुद्धा काही नसल्यासारखं का वाटतंय? का मला याचा त्रास होतोय? का हेच सत्य आहे?  कदाचित तो माझ्या मनाचा गोंधळ असू शकेल.......

मला माहित आहे, ठावूकही आहे.......हे सारं अखेर सत्यच आहे. कितीही खोटं म्हटलं तरी ते सत्यच आहे..... मला त्याची कारणंही ठावूक आहेत.... ती ......होय, तीच आहे याच, या उदासीनतेच कारण!

पण तुम्हाला ती माहित नाहीय! तसं पाहिलं तर मला तरी कुठं ती माहित होती? जीवनाच्या प्रवाहात खूपजण भेटतात, तशीच तीही भेटली होती. कुठे भेटली, कशी भेटली अन केंव्हा भेटली या प्रश्नांना काहीही अर्थ नाही. पण जीवनाला खरा अर्थ आला तो ती भेटल्यानंतरच!    

'जीवनगाणे' गात फिरणाऱ्या एका भटक्याला सूर अन स्वर सापडला! जिंदगीचा नूर गवसला तो त्या पहिल्या भेटीतच! नदीच्या पात्रात दगड भिरकवल्यानंतर उठणाऱ्या तरंगाप्रमाणे माझ्या जीवनात नवे खुषीचे तरंग उठले ते ती भेटल्यानंतरच!

कधी तिच्या गालावरची गुलाबी छटा चोरून संध्याकाळ विश्वाला मोहवायची तर कधी तिच्या काळ्याभोर कुरळ्या केसांच्या वाऱ्यावर उडणाऱ्या बटाप्रमाणे अंधार सभोवताली पसरत जायचा. तिच्या पायातील पैजणांच्या नादावर ताल धरीत पाखरं भुर्रकन उडत घरी परतायची. तिच्या गोऱ्यापान भव्य कपाळावरची कुंकवाची गोल कोर नदीच्या शांत निळ्या पाण्यात पडलेल्या लालभडक सूर्यबिंबाच्या प्रतिबिंबाशी स्पर्धा करायची. मावळतीचे किरण तिच्या गालावरची गुलाबी छटा अधिकच उठावदार गडद करायचे तर तिच्या मिटलेल्या पापण्यांची अर्धचंद्राकृती नुकत्याच उमललेल्या चंद्रकोरीशी नाते सांगायची अन तिचे डोळे .......त्यांना पाहून तिला कमलनयना म्हणावं की मृगनयना म्हणावं याचाच मला प्रश्न पडायचा.  

.......पण ! पण ते आठवून आता काय उपयोग? माझ्या पायात चुकून काठावरचा एखादा खडा रुतला तर जिच्या डोळ्यातं चटकन पाणी यायचं तिला माझ्या हृदयात घाव घालताना काहीच वाटलं नाही? जिथं मनच आता  रक्तबंबाळ झालंय, तिथं पायाची काय कथा? माझ्या कपाळावर रुळणाऱ्या बटांना मागं सारणारे तिचे हात माझ्या जीवनावर काळेकभिन्न सावट आणू शकतात हे अनुभवाने पटलं.  

ती आता कोठे आहे कोणास ठावूक! ती पुन्हा भेटेल अन तिला या विश्वसद्याताचा जाब विचारावा या एका जाणीवेपायी तळमळतोय! आठवतंय......एकदा म्हणाली होती, तुझ्याशिवाय मी जगूच शकणार नाही "कृष्णाविना राधा जर राहूच शकत नसेल, तर तुझ्याविना मी कशी जगेन?".......



हो मला आठवतंय! मी त्याला एकदा म्हणाले होते....तुझ्याविना मी जगूच शकणार नाही जशी कृष्णाविना राधा........! पण .........! त्याला तोडून त्याच्या जीवनातून अखेर बाजूला व्हावंच लागलं. सारीपाटाचा डाव मांडून तो मोडावाच लागला. त्याला वाटत असेल अखेर तीही विश्वासघातकीच निघाली कदाचित नदीच्या तीरावर त्या ठिकाणी तोही जुन्या आठवणीना उजाळा देत बसला असेल. पण मी विश्वासघातकी नव्हते. मी तुला फसविलं नाही रे! कसं सांगू? खूप खूप सांगायचं पण सांगता येत नाही.........!

.........त्याला वाटेल माझं त्याच्यावर प्रेमच नव्हतं,  सारं काही नाटकंच होतं पण सत्य त्याला कधीच कळालं नाही ........अन ते त्याला कधीच कळणार नाही. त्यादिवशी त्याला तशीच सोडून आले काहीही न कळविता! अन तेंव्हापासून मीही अशी जळते आहे.

ती नदी ती सुहानी शाम! सारं काही आता विसरून जायचंय ! पण विसरून जायचं म्हटलं तरी ते कसं शक्य आहे? ते का वाळूचे किल्ले आहेत - पाहिजे तेंव्हा बनवायला अन मन मानेल तेंव्हा मोडायला ! मला माहित आहे, तो अजूनसुद्धा जळत असेल, कुडत असेल पण......! पण मी काय करू शकणार होते? त्याची स्वप्नं पूर्ण करणं मला कसं शक्य होतं! त्याची स्वप्नं फुलवून तोडण्यापेक्षा मला विश्वासघातकी समजून जाणं हेच श्रेयस्कर होतं. मी त्याला कसं सांगू शकत होते की मी........मी........मी.......मी फक्त थोड्याच दिवसांची सोबती आहे म्हणून! .......की मी कैन्सरसारख्या असाध्य रोगाची बळी आहे म्हणून ! अन त्याचं उमलत जीवन माझ्यासुखासाठी स्वास्थ्यासाठी बरबाद करण्याचा कोणता हक्क मला होता? 



 ........वेडे ! किती मोठी चूक केलीस? तू मला एवढ्या सहवासानंतर सुद्धा समजू शकली नाहीस! हीच का माझ्या प्रेमाची पारख केलीस? माझ्यासाठी एवढा मोठा त्याग केलास, मलाही त्यात वाटेकरी का नाही करून घेतलंस? अगं प्रेम म्हणजे नुसतं सुखाच्या, आनंदाच्या क्षणात वाटेकरी होणं नव्हे. दुःखाचे पर्वत देखील जोडीनं पार करणं म्हणजे प्रेम! विषाचे घोट पाचवीत पुढे जाणं म्हणजे प्रेम! काळलाटांच्या घनघोर प्रलयात आपलं शीड जोडीनं पुढं हाकण म्हणजे प्रेम! प्रीतीचे बंध रेशमाचे जरूर असतील पण महाप्रलयात काळरात्रीही न तुटण्याइतके ते मजबूतही असतात. पण.......! पण आता काय त्याच..........? तू गेलीस .......... जाताना मला रेशमी चिवट दोरान जखडून!   
  
                                             
           

Tuesday, April 19, 2011


'माझी सखी.......निराळी!'


आज 'सखी' दिसली.

म्हणजे आज खऱ्या अर्थानं 'सखी'  भेटली.

निमित्तही असंच काहीस निराळं! सखीच्या मांडीवर डोक ठेऊन मी नुसताच तिच्याकडे पहात विसावलो होतो जसा कल्पवृक्षाच्या सावलीखाली! सखी माझ्या कपाळावरून हात फिरवित गात होती.......

'जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पहाते.....वाट पहाते'

या काव्यपंक्ती सखीच्या कंठातून नुसत्याच बाहेर पडल्या नाहीत तर मला नादमुग्ध करून गेल्या. लताला सुद्धा कधी एवढा 'वन्समोअर ' मिळाला नसेल तेवढा मी आज ते गाणं सखीकडून ऐकण्यासाठी अधीर झालो होतो. गाण्याच्या प्रत्येक अक्षराला स्व:ताच  एक वजन होतं, प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ होता, प्रत्येक शब्दांनी गुंफलेल्या या काव्यपंक्तीला भावनिक ओढ तर होतीच......पण त्यापेक्षा सुद्धा सखीच्या कंठातून आलेल्या या सुरेल स्वरांना प्रेमाची, मायेची, कारुण्येची अन आपुलकेची झालर होती. त्यामुळे आज हे गाणं नुसतं सुरेलंच झालं नव्हत तर पारिजताका सारखं फुलून आलं होतं, चाफ्यासारखं सुगंधी झालं होतं, गुलाबासारखं टवटवीत तर होतंच पण निशिगंधाची ओढही तितकीच होती.

सखीचंच  गाणं आज का माझ्या मनाला एवढ भावलं?
.......कारण ते फक्त सखीच गाणं होतं. अनेक गोष्टींची ज्याप्रमाणे उभ्या आयुष्यात उत्तरं मिळत नाहीत त्याचप्रमाणे सखीच गाणंही! याचंही उत्तर मिळणार नाही. 
'सखी एक स्वप्न आहे', 'सखी एक कोडं आहे', 'सखी एक वेड आहे'..........म्हणूनच सखी इतरांपेक्षा वेगळी आहे.

'सखी' खरंच तू आजही चांगली गातेस आणि अजूनही तुझा आवाज 'तसाच ताजा आहे'
'चल उगाच कौतुक करू नकोस.'

खरंच.......तेवढे मला गाण्यातलं कळतंय आणि हो डोळ्यातलही. सखी खर सांगू? तू तुझ्या गळ्यानं गातच नाहीस मुळी...........तू गातेस ते तुझ्या डोळ्यानं........म्हणूनच जेंव्हा जेंव्हा हे गाणं मी तुझ्याकडून ऐकतो तेंव्हा तेंव्हा मला फक्त तुझ्या डोळ्यातील भाव दिसत असतात.

'वेडा आहेस'......अगदी पूर्वी होतास तसाच.......
हो, आहेच मुळी......पण वेड कशाचं यावर त्या वेडेपणाची व्याख्या ठरत असते आणि खरंतर माणसानं थोडं वेडं असावच नाहीतर जीवनातील आनंदच उपभोगता येत नाही. निस्वार्थीपणाने आपण हे वेड घ्यावे आणि स्व:ताला झोकून द्यावं. आणि माझ्या या वृत्तीला जर तू वेड म्हणत असशील तर सखी मी आहेच...... 
काही क्षण आमच्यात अशीच निषब्धता होती.......शांत झालेल्या समुद्रासारखी अन फुलू लागलेल्या चांदण्यासारखी!

'अरे असा बघतोस काय? बोल ना?'
काय बोलू? किती बोलू? आणि कसे बोलू? ज्यावेळी शब्द अपुरे पडतात त्यावेळी त्याची जागा नजरेनी घेतलेली असते आणि खर सांगू? ......म्हणूनच आज तुला पुन्हा मी नव्यानं पाहतोय....जाणतोय....आणि समजूनही घ्यावयाचा प्रयत्न करतोय.

काय काय आठवतेय तुला? माझी आठवण होत होती तुला? सखी विषयाला बगल देत होती....
'आठवण'......मी नुसताच हसलो,
'का हसलास?'....'आठवण येत नव्हती का?'
येत होती ना.
किती वेळा?
यायची मधेच केंव्हातरी......
आणि?.......
आणि तेंव्हा ढवळून टाकायचीस सगळं.
'मला बरं वाटावं म्हणून म्हणतोस?'   
'मुळीच नाही, खरंच सगळं ढवळून टाकतेस, आठवतेस तेंव्हा! संसार हा धीरगंभीर, उदात्त रागदारीसारखा असतो, तास तास चालणारा, ठाय, विलंबित, द्रुत अशा अंगानं फुलणारा, केंव्हा केंव्हा फार संथ वाटणारा, उदास करणारा, कंटाळा आणणारा, आणि मध्येच तुझ्यासारखी सखीची आठवण, ही मोठा राग आवळून झाल्यानंतरही ठुमरीसारखी असते, दहा मिनिटांत संपणारी, पण सगळी मैफल गुंगत ठेवणारी, मरगळ घालवणारी.

पुन्हा सखीने पूर्वीच्याच चातुर्यानं मला गप्प केलं, सखी सर्व जाणत होती पण तरीसुद्धा तिला आणखी खोलात जायची इच्छा नव्हती.........भूतकाळ हा भूतकाळच तिला ठेवायचा होता. सखी बोलत नव्हती......पण तिच्या डोळ्यातील भाव मला समजावत होते.

'अरे......... त्याचं काय असतं की काही काही रागदारीत काही काही स्वर वर्जच असतात त्याला तू काय करणार? म्हणून तुझ्या आठवणीत, सहवासात मला रमता येत नाही. वर्ज झालेला स्वर वाईट असतो म्हणून वगळायाचा नसतो, तर एक राग उभा करायचा असतो. त्यासाठी आपण तो खुशीनं विसरायचा असतो. वाद्यातला तेवढ्या पट्या उपटून फेकायच्या नसतात, त्यांना फक्त चुकवायचं असतं ......कळलं? .....सखी जीवनाचं मर्म सांगत होती.
  
'तुझ पटतंय गं, नाही अस नाही. पण सप्तकातले किती स्वर चुकवायचे?'
सखीनं आपल्या हाताचा तळवा माझ्या ओठावर ठेवीत मला गप्प केल अन 'बाय' म्हण अस सांगत स्वप्नांत रमण्यासाठी सिध्द झाली.

माझी सखीवरची नजर काही हलत नव्हती तरी मी अनाहूतपणे विचारलं........
'पुन्हा कधी?'
'जेंव्हा पुन्हा योग येईल तेंव्हा'.........सखीचं नेहमीचंच उत्तर.
'म्हणजे जेंव्हा आपण म्हातारे झालेले असू तेंव्हा?' माझा सखीला पुन्हा प्रश्न...  
सखी माझ्या केसांतून हलकेच हात फिरवित मोठ्यांदा हसली.......
'तस्साच वेडा आहेस'

मी अगतिकपणे सखीला बिलगलो, कुशीत विसावयाचा प्रयत्न केला......आणि जाणवलं......की, सखीचं 'जिवंत दिल' अजूनही गात होतं.......

'दूरदेशीच्या राजकुमाराची स्वप्ने पाहतांना, 
कुणीतरी यावे हळूच मागून ध्यानी मनी नसताना,
नकळत आपण हरवून जावे स्व:तास मग जपतांना,
अन मग डोळे उगडावे मग ही दिवा स्वप्नं पाहतांना,'

'आयुष्य हे............!!!'
  
  

Saturday, April 16, 2011


इवलसं मनं   



तन भी सुंदर मन भी सुंदर, तू सुंदरताकी  मुरत है, 
किसी और को शायद कम होगी, मुझे तेरी बहोत जरुरत है,
पहिले ही बहोत मै तरसा हुं, तू और न मुझको तरसाना.....
   
मुकेशच्या गळ्यातून या सुंदर काव्यपंक्ती बाहेर पडत होत्या आणि माझे मन मात्र मला कुठे दुसरीकडेच घेवून जात होते ......मी कुठेतरी हरविलो होतो ....कुठल्यातरी भूतकाळात पोहोचलो होतो......

भोवताली हिरवीगार गर्द वनराई, निळे शुभ्र आकाश, नितळ पारदर्शक पाण्यानी नटलेला समुद्र अशा सुंदर, शांत, मनमोहक वातावरणात मानव जन्माला आला. शुद्ध, स्वच्छ मनानं जन्माला आलेला माणूस याहून वेगळा असणेच कठीण. बालपणातील या निसर्गाच्या वरदानान  लाभलेल्या गोष्टी कालांतरान लुप्त पाऊ लागल्या माणसाचं मन दुसऱ्याच विकृत गोष्टीनी व्यापू लागलं. परमेश्वरानं माणसाला तन आणि मन दिल. उमलणाऱ्या फुलासारख्या या दोन गोष्टी दिल्या आणि या गोष्टींचा सदुपयोग करण्यासाठी दिली ती बुद्धी!....

पण, शेवटी माणूस तो माणूस! त्याला 'तन' आणि 'मन' यातला फरकच नाही कळला. तन आणि मन! दोन छोट्या-छोट्या अक्षरांचे दोन छोटे-छोटे शब्द. कुठेही काना, मात्रा, वेलांटी  न सापडण्याइतके सरळ शब्द. किती भावना लपलेल्या आहेत या दोन छोट्या शब्दात. ज्याला या दोन शब्दातला फरक कळला, अर्थ समजला, वागायचे कसे याचे ज्ञात झाले  त्यानेच आपल्या बुद्धीचा उपयोग केला असे म्हणावे लागेल. तन आणि मन याबरोबर परमेश्वरानं  माणसाला बुद्धी दिली ती एवढ्यासाठीच की माणूस आणि पशु यामधील फरक हा माणसाला समजावा. पण बुद्धी न चालविणाऱ्या माणसाला तन काय आणि मन काय? अर्थ एकच! 

तन आणि मन! एक दिसणारी अन दुसरी न दिसणारी. कुठली महान आणि कुठली लहान. माझ्यामते दोन्हीही महान. पण ज्याचा स्वतःच्या मनावर ताबा आहे तो माणूसच महान आणि अशा माणसाचा त्याचा शरीरावर त्याहूनही अधिक ताबा असतो. म्हणूनच माणसानं आपल्या मनाला आपल्या मुठीत ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे. ज्याचं मन तडफडत असतं त्याचं कोणत्याच गोष्टीवर नियंत्रण नसतं. तो नुसताच वाऱ्याच्या प्रवाहानुसार वाहवत असतो. कारण त्यावेळी त्याची स्वतःची बुद्धीच गहाण पडलेली असते. म्हणून  माणसानं आपल्या आयुष्यात स्वतःच्या मनावर, बुद्धीवर नियंत्रण ठेवावयास हवं. या शक्तीनं आपल्यावर नव्हे. मनावर ताबा असणारा माणूस असं कोणतंच विघटीत कार्य करू शकत नाही की जे त्याच्या मनाला पटत नाही. शरीर हे दिसणारं आहे, हाडामासान  तयार झालेला तो एक सामान्य देह. शरीरावर कोणतीही झालेली जखम माणूस सहन करू शकतो पण मनाचं तसं नसतं. मनावर झालेला आघात तो कोणत्याच प्रकारे लपवू शकत नाही आणि मनाच्या खोल गाभाऱ्यात झालेली जखम तो सहजासहजी पुसूही शकत नाही. मन ते मन त्याच्या त्याच्या जखमांना औषध नसतं. असते ती फक्त एक नाजूक भावना आणि या नाजूक भावानावरच त्याचं हे मन जगत असतं. बुद्धीची साथ ज्यावेळी मनाला लाभते तेंव्हा त्याच्या मनाची व्याप्तीच वाढते. सागरासारखं अफाट असं त्याचं होतं. संकुचित वृत्तीच्या माणसांची मनही संकुचित असतात कारण संकुचित मनाला बुद्धीचं पाठबळ नसतं.

माणसानं मनावर प्रेम करावं की शरीरावर!

.......खरंतर मनावर. शरीराचा प्रत्येक अवयव मनाच्या मंदिरातूनच वाटचाल करीत असतो. मनात जर हलकल्लोळ माजलेला असेल तर सुदृढ शरीर सुद्धा साथ देत नाही. म्हणून मनाला सांभाळणे महत्वाचे. मनातील विचार हे अमृतासारखे गोड असावेत, दुधासारखे शुभ्र असावेत, पाण्यासारखे पारदर्शक असावेत आणि फुलासारखे कोमल असावेत. विचारांवर बंधन असू नये. विचाराला गती असावी, विचार पुढेपुढे सरकावयास हवेत. माणसानं मनावर प्रेम जरूर करावं पण याचा अर्थ असं नाहीय की त्यानं शरीराकडे दुर्लक्ष करावं. शेवटी तन आणि मन हेच माणसाचं व्यक्तिमत्व घडवीत असतं.

तन हे आपलंच आहे आणि मनही आपलंच आहे. तनही सुंदर आहे आणि मनही सुंदर आहे....पण.....पण......  
         
मनानं शरीरावर नियंत्रण ठेवायचं असतं आणि बुद्धीनं मनावर ताबा मिळवायचा असतो. बस्स फक्त एवढंच आयुष्यात करावयाच असतं!   

Sunday, January 23, 2011


प्रेमाला उपमा नाही......



माणसानं माणसावर प्रेम करावं तरी किती? किती म्हणजे खरंच किती? कोण सांगू शकेल याचं उत्तर?, नाही...याला उत्तर नाही. आणि कोण कुणावर किती प्रेम करतो याचेही काही मोजमाप आहे का? आयुष्यात सगळ्या गोष्टींचं वजन करता येतं, अस जर गृहीत धरलं तर प्रेमाचं का बरं नाही?..... नाही.....नाही...ते पण शक्य नाही. अरे, नजर, स्पर्श आणि अंत:करणातील भावनांनी विणलेल्या प्रेमरूपी जाळ्याच तू काय वजन करणार? अरे मित्रा, जाळ्यात एकदा अडकल्या नंतर जर तुला बाहेर पडावयाचा मार्गच माहित नसेल तर तू काय करणार? ते कोळाष्टक  आहे बाबा, नुसतं विणत जायचंय .......विणत जाताना सुद्धा त्याला नाही कळत की आपण किती विणलंय अन कुठं चाललोय. कुठल्यातरी धक्क्यानं ते तुटतं तरीसुद्धा तो ते परत विणत असतोच, कारण त्याला त्या जाळ्यातच जीवन जगायचं असतं!

चुकलास  तू,...........मित्रा, .......नजरेतील भाषा, प्रेमाचं सहारा आणि अंत:करणातील भावनांचा आवेग जर तू ओळखू शकत नसशील तर तुला प्रेमाचा अर्थच माहित नाही असे म्हणावे लागेल. मित्रा,..... नजर, स्पर्श आणि प्रेमाची भावना इतकी सर्वश्रेष्ठ आहे की नुसते शब्द कमी पडतील म्हणून निसर्गान स्पर्श निर्माण केला.....कळलं?

......पण.......पण तरीसुद्धा आपल्याला प्रेमाचा त्रास का म्हणून होतो? का मला त्याचा विरह सहन होत नाही? का त्याविना मी राहू शकत नाही? अरे, मी तर 'त्या प्रेमावर' माझ्या जिवापेक्षा जास्त प्रेम केलंय रे तरीसुद्धा मलाच का बर ते स्वस्थ बसू देत नाही? मला तिच्या विचारात का बरं अडकवून ठेवलंय? खरंच........खरंच मला याचं कुणीतरी उत्तर देऊ शकेल का?
  
......पुन्हा चुकलास,........मित्रा......अरे प्रेमात आपण काय देतो, किती देतो याचा विचार करावयाचा नसतो बाबा......आपण नुसतं आपल्याकडे जे काही आहे ते देत राहायचे असते. घेण्यापेक्षा देण्यातच आनंद मान म्हणजे सुख तुझ्या पावली स्वत:हून चालत येईल आणि एक गोष्ट लक्षात ठेव.....अंत:करणातील रसिक हा असामान्य मानव असतो, त्या रसिकाला जागवायचा तू प्रयत्न कर, म्हणजे तुला कळेल की घेण्यापेक्षा देण्यातच आनंद आहे कारण 'जिच्याशिवाय' तू राहू शकत नाहीस त्यामध्ये 'तुझ्यापेक्षा' 'तिचाच' वाट जास्त आहे......'तिच्याच' प्रेमाचं वजन जास्त आहे......'तिच्या' अंत:करणातील रसिक हा खऱ्या अर्थानं असामान्य आहे........'समजलं' ???            

                      

Thursday, January 6, 2011

गंध फुलांचा गेला सांगून.......


ट्रिंग ......ट्रिंग......मोबाईलची रिंग वाजली. ठरविलं होतं आज शनिवार आहे, सुट्टी आहे, लवकर नाही उठायचं. निवांत ताणून द्यायची. आठवड्याचा क्षीण घालवायचा. गादीत इकडून तिकडून लोळत वेळ काढायचा. सूर्याची किरणे डोक्यावर येईपर्यंत आपले डोके पांघरुणातून वर काढायचे नाही असाही अट्टाहास होता. पण सर्व काही व्यर्थ होते......कारण होतं तर तो मोबाईल आणि त्याची ती वाजणारी रिंग! 
  
चडफडतच मी पांघरुणातून बाहेर आलो. डोळ्यावर अजूनही झोप होती. अंधुकशा प्रकाशात घड्याळात किती वाजले हे पाहावयाचा प्रयत्न केला. पहाटेचे पावणे सहा वाजल्याचे पाहून अन पुन्हा त्या मोबाईलच्या वाजणाऱ्या आवाजाकडे पाहून, डोळे ताणत थोड्याश्या नाईलाजानेच मोबाईल उचलला.......जिन्याच्या पायऱ्या उतरत असतानाच मोबाईलचे हिरवे बटन दाबले आणि.....आणि....पायरीवरून पाय घसरला. मी चार पायऱ्या खाली होतो. तसाच स्वत:ला एका हाताने सांभाळीत पलीकडचा आवाज ऐकत होतो......

......हेलो......ओळखलस का?....... मी कोण बोलतेय?....... 

काही क्षण स्तब्धता ! मी स्वत:ला हलकेच चिमटा काढला तर खरचं मी जागा होतो, स्वप्नात नव्हतो. पायरीवरून पाय का घसरला हे त्याक्षणी उमजले. एरवी थोडी कर्कश वाटणारी ती रिंग आज अचानक मंजुळ का झाली हेही कळले. एखाद्या बंदुकीतून जशी गोळी सुटावी व शरीरातून आरपार जावी.......तसे ते दोन शब्द थेट माझ्या हृदयाला जाऊन भिडले होते व त्या शब्दांनी आपला संदेश तात्काळ मेंदूला कळविला होता. मेंदूचं आणि हृदयाचं हे देणं-घेणं सुरु असतानाच माझ्या शरीरातून एक नकळत शिरशिरी येऊन गेली. 

......हेलो......ओळखलस का?....... मी कोण बोलतेय?.......

या पुन्हा उच्चारलेल्या शब्दांनी डोळ्यावरची झोप केंव्हाच उडाली होती. जो आवाज मी अडीच दशकामागे कळत-नकळत मागे सोडून आलो होतो तो आवाज आज.... आज तसाच......अगदी तसाच.....हुबेहूब......जसा कालच ऐकला होता तसाच माझ्या कानात नाद करीत होता. तोच आवाज, तीच लय, तेच सूर, तोच कंप, तीच भावना, तोच आनंद, तोच अधिकारपणा, तीच अदाकारी, आवाजात तीच लकीर, तीच ताकद......तीच मादकता......सर्वकाही  तेच......अगदी जसेच्या तसे......आवाज मी न ओळखणं शक्यच नव्हतं........ओळखलस का? या प्रश्नांकित शब्दांच्या वेळीच मी तिला नुसती ओळखलीच नव्हती तर पहाटेच्या अंधुकशा प्रकाशात सुद्धा माझ्या डोळ्यासमोर जशीच्या तशी तिला उभी केली होती. मेंदू आणि हृदयानं आपल काम चोख पार पाडलं होतं अन नियतीचा न जुळलेल्या स्वरांची बंदिश बांधण्याचा खटाटोप चालला होता ! 

......हेलो......ओळखलस का?....... मी कोण बोलतेय?.......   
            
याच क्षणी आठवलं पृथ्वी गोल आहे असं शाळेत का सांगायचे....जग खूप लहान आहे.....मुठीत मावण्याएवढे असं का म्हणायचे......ऐकणं आणि बोलणं यामध्ये फक्त चार बोटांचच अंतर असतं असं का सांगितलं जायचं.....इतिहासाची पुनरावृत्ती होते असं का शिकवलं जायचं.....एक राजा असतो, एक राणी असते.....त्यांचे भांडण होते.......अन शेवटी ते सुखाने संसार करू लागले ...अशा गोष्टी का असायच्या.......जावून येतो असं म्हण असे घरी का शिकवायचे........सर्व काही उमजत होतं आज पहाटेच्या प्रहरी.........आणि हेही काळात होतं की 'दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघां पुन्हा नाही भेट'......हे ही किती खोटं होतं.

......हेलो......ओळखलस का?....... मी कोण बोलतेय?.......

शब्दांच काय गं, ते तर काना, मात्रा आणि वेलांटी यांनी भरलेला शब्दसंग्रह! त्याचा अर्थ कळतो जेंव्हा लेखक आपल्या लेखणीतून एकएक मणी गुंफावा तसे शब्द गुंफतो आणि जसा अलंकार बनवावा तशी कथा लिहितो.

शब्दांच काय गं, ते तर स्वर आणि व्यंजनाने भरलेला संच ! पण याचाही अर्थ उमजतो जेंव्हा प्रतिभाशाली कवी त्या शब्दांना आपल्या दोरखंडानी बांधतो, संगीतकार त्याला आपल्या स्वरांनी नादमुग्ध करतो आणि गायकाच्या गळ्यातून जसेच्या  तसे उतरवितो.

तसेच हे तुझे पहाटेचे दोन शब्द.......माझ्या लेखणीस गुंफलेले आणि मनांत गुंतलेले!.......आपुलकीचे, आपलेपणाचे आणि ओलाव्याचे !

......हेलो......ओळखलस का?....... मी कोण बोलतेय?.......

तुला माहित आहे.......ओळख ही आवाजात नव्हतीच मुळी.....ती आवाजाच्या पलीकडची होती, ओळख होती ती स्पंदनाची ! स्पंदने होती हृदयांची की जी हजारो मैलावरून सुसाट वाऱ्याच्या वेगानं आलेल्या धूमकेतूची. तू मोबाईलचे हिरवे बटन दाबलेस तेंव्हाच ही स्पंदने एकजीव झाली होती आणि ओळखही तेंव्हाच झाली होती......कुठतरी त्याच रुपांतर फक्त शब्दात झालं होतं जेंव्हा मी माझ्या मोबाईलचे हिरवे बटन दाबले तेंव्हा.....
  
म्हणून आजही तुला ओळखण्याचा प्रश्न नव्हताच.......आपली ओळखही होतीच.....ओळख होती ती 'बालपणाची', ओळख होती ती 'अपूर्ण स्वप्नांची', ओळख होती ती 'न विसरलेल्या आठवणींची', ओळख होती ती 'भातुकलीच्या खेळामधली'........जशी काल......तशीच आजही......

..............फक्त  'क्षणभरासाठी' या दोनही आवाजांनी थोडी विश्रांती घेतली होती ! ......पुन्हा नव्यानं भेटण्यासाठी ..........!

........हेलो......ओळखलंय मी तुला.......तू...... ??? !!!