तिच्यापासून आज मी बराच दूर होतो. बराच म्हणजे हजारो मैलांवर. जितक्या तिच्या जवळ राहून सुखं उपभोगीत होतो. तितक्याच दूर आज राहून दु:ख पचविण्याची तयारी चालू होती. सुखाचे महत्व काय असते याची जाणं ही आज येत होती. निसर्गाला खूप जवळून पाहण्याचा योग येत होता. निसर्गानं आपल्या सौंदर्याची उधळण इतकी का करावी अस राहून राहून वाटत होतं. कारण हे सौंदर्य या माझ्या इवल्याशा डोळ्यांमध्ये सामावण्यासारखे नव्हते. आपण कोठेतरी वेगळ्याच विश्वात पोहोचल्याची जाणीव होत होती. निसर्गानं पसरविलेल्या हिरव्यागार मखमली गालिच्यावरून हलकेच पाऊले चालत होती. तळव्यांना आल्हाददायक स्पर्श होत होता. समोर वाऱ्याच्या हलक्याच धक्यान वृक्षांच्या फांद्या आपल्याच नादात डुलत होत्या. वेगवेगळ्या रंगातील फुले मनाला भोवळ घालीत होती. तेवढ्याच नैसर्गिक रंगान आकाश सजविण्यास सुरुवात केली होती आणि न राहवून पक्षांनी आपली हलकीच किलबिल सुरु केली होती. या हिरव्यागार वनराईतून पारदर्शक पाण्याचा झरा खळखळ आवाज करीत हृदयाची स्पंदने वाढवित होता. निसर्गानी आपली मैफिल सजविली होती. तो कुणाच्यातरी येण्याच्या प्रतीक्षेत होता. मी वृक्षांच्या आडोशाला उभा होतो. माझ्या अस्तित्वाची जाणीव न होऊ देण्याची मी काळजी घेतली होती. सर्वत्र सन्नाटा पसरलेला होता. काहीतरी घडणार आहे याचा संकेतच जणूकाही मिळत होता. तेवढ्यात अचानक वाऱ्याचा वेग वाढल्याची जाणीव झाली. पक्षांनी किलबिल करीत आकाशाकडे झेप घ्यावयास सुरुवात केली. कळ्यांनी आपल्या रंगात आणखीनच भर टाकीत फुलावयास सुरुवात केली. सूर्याची तांबडी किरणे ढगाच्या पोकळीतून डोकाऊ लागली. पाण्याचा खळखळाट वाढला होता. पाण्याच्या लाटा एकमेकांवर आपटून त्याचे शिंतोडे माझ्या अंगावर येत होते. मी वृक्षांच्या एका कोपऱ्यात तसाच स्तब्ध उभा होतो. समोर धुकं पडल्यानं फारस काही दिसत नव्हत. एवढ्यात कुठूनतरी छन.....छन.....हे मंजुळ स्वर कानी पडले. आवाजाच्या दिशेन मी मान फिरविली पण तेथे काहीच नव्हते. पुन्हा तोच आवाज, मी न राहवून सर्व बंधने तोडून त्या आवाजाच्या दिशेन धावू लागलो. धुक्याचा पडदा फाडून मी त्या पडद्यापलीकडे पोहोचलो आणि......आणि.......
.......आणि समोर 'तीच' होती....हो, तीच होती. हिरव्यागार वस्रामध्ये तीन स्वतःला लपविले होते. निसर्गाच्या वरदानान लाभलेल्या केसांच्या झुल्याला वाऱ्याच्या दिशेन मोकळ केलं होतं. सूर्याची लाल किरणे कर्णफुलांची लकाकी वाढवित होता. नाकातील नथ सौंदर्य फुलविण्यामागे लागली होती. हातातील बांगड्यांचा खळखळाट हा पाण्याच्या आवाजाला आव्हान देत होता. चंद्रकलेची कोअर कपाळावर सौंदर्याला पूर्णत्व देत होती. ती हळूहळू आपल्या नाजूक पावलांनी माझ्याजवळ येत होती. हृदयाचा एकएक ठोका चुकत होता. अंगावर कंप निर्माण झाला होता. बोचऱ्या थंडीत सुद्धा घाम फुटू लागला होता. खरंच वनराईच्या सानिध्यातील ते दृश्य मनमोहक असेच होते. ती आता माझ्या जवळच होती. तिने आपल्या चेहऱ्यावर ओघळणाऱ्या केसांच्या बटाना मागे सारले होते. तिने आता आपल्या ओठांची ठेवण बदलीत माझ्याकडे पाहत स्मितहास्याची फुंकर मारली होती. नजरेची भाषा बरंच काही समजावून जात होती. काही क्षणाचाच हा प्रसंग होता. तिची पाठमोरी आकृती माझ्या नजरे समोरून दूर जात होती. माझ्या पावलांचा वेग आता वाढला होता. तिला गाठायचं होतं. ती माझ्या बरीच पुढे निघून गेली होती. तिच्या एका हास्यान माझ्यातला मी हरवून बसलो होतो. माझं वेड मन तिच्या माग धावत होतं. आता मला कशाचही भान राहिलं नव्हतं. तिची पुसटशी आकृती धुक्याआड जात होती. मी असाच बेफान झालो होतो. तिला मी गाठली होती. तिच्या खूपच जवळ आता मी पोहोचलो होतो. मी न राहवून तिच्या जवळ जावयाचा प्रयत्न केला. कड्यावरून केंव्हाच तोल गेला होता आणि.........
.....आणि एक .....एक व्याकुळ किंकाळी अनंतात विलीन झाली होती. वृक्षांवरील पक्षांनी पुन्हा किलबिल सुरु केली होती. वनराई शांततेत नांदत होती आणि ती माझ्या 'त्या' निस्तेज देहाकडे पाहून 'हसत' होती!