गंध फुलांचा गेला सांगून.......
ट्रिंग ......ट्रिंग......मोबाईलची रिंग वाजली. ठरविलं होतं आज शनिवार आहे, सुट्टी आहे, लवकर नाही उठायचं. निवांत ताणून द्यायची. आठवड्याचा क्षीण घालवायचा. गादीत इकडून तिकडून लोळत वेळ काढायचा. सूर्याची किरणे डोक्यावर येईपर्यंत आपले डोके पांघरुणातून वर काढायचे नाही असाही अट्टाहास होता. पण सर्व काही व्यर्थ होते......कारण होतं तर तो मोबाईल आणि त्याची ती वाजणारी रिंग!
चडफडतच मी पांघरुणातून बाहेर आलो. डोळ्यावर अजूनही झोप होती. अंधुकशा प्रकाशात घड्याळात किती वाजले हे पाहावयाचा प्रयत्न केला. पहाटेचे पावणे सहा वाजल्याचे पाहून अन पुन्हा त्या मोबाईलच्या वाजणाऱ्या आवाजाकडे पाहून, डोळे ताणत थोड्याश्या नाईलाजानेच मोबाईल उचलला.......जिन्याच्या पायऱ्या उतरत असतानाच मोबाईलचे हिरवे बटन दाबले आणि.....आणि....पायरीवरून पाय घसरला. मी चार पायऱ्या खाली होतो. तसाच स्वत:ला एका हाताने सांभाळीत पलीकडचा आवाज ऐकत होतो......
......हेलो......ओळखलस का?....... मी कोण बोलतेय?.......
काही क्षण स्तब्धता ! मी स्वत:ला हलकेच चिमटा काढला तर खरचं मी जागा होतो, स्वप्नात नव्हतो. पायरीवरून पाय का घसरला हे त्याक्षणी उमजले. एरवी थोडी कर्कश वाटणारी ती रिंग आज अचानक मंजुळ का झाली हेही कळले. एखाद्या बंदुकीतून जशी गोळी सुटावी व शरीरातून आरपार जावी.......तसे ते दोन शब्द थेट माझ्या हृदयाला जाऊन भिडले होते व त्या शब्दांनी आपला संदेश तात्काळ मेंदूला कळविला होता. मेंदूचं आणि हृदयाचं हे देणं-घेणं सुरु असतानाच माझ्या शरीरातून एक नकळत शिरशिरी येऊन गेली.
......हेलो......ओळखलस का?....... मी कोण बोलतेय?.......
या पुन्हा उच्चारलेल्या शब्दांनी डोळ्यावरची झोप केंव्हाच उडाली होती. जो आवाज मी अडीच दशकामागे कळत-नकळत मागे सोडून आलो होतो तो आवाज आज.... आज तसाच......अगदी तसाच.....हुबेहूब......जसा कालच ऐकला होता तसाच माझ्या कानात नाद करीत होता. तोच आवाज, तीच लय, तेच सूर, तोच कंप, तीच भावना, तोच आनंद, तोच अधिकारपणा, तीच अदाकारी, आवाजात तीच लकीर, तीच ताकद......तीच मादकता......सर्वकाही तेच......अगदी जसेच्या तसे......आवाज मी न ओळखणं शक्यच नव्हतं........ओळखलस का? या प्रश्नांकित शब्दांच्या वेळीच मी तिला नुसती ओळखलीच नव्हती तर पहाटेच्या अंधुकशा प्रकाशात सुद्धा माझ्या डोळ्यासमोर जशीच्या तशी तिला उभी केली होती. मेंदू आणि हृदयानं आपल काम चोख पार पाडलं होतं अन नियतीचा न जुळलेल्या स्वरांची बंदिश बांधण्याचा खटाटोप चालला होता !
......हेलो......ओळखलस का?....... मी कोण बोलतेय?.......
याच क्षणी आठवलं पृथ्वी गोल आहे असं शाळेत का सांगायचे....जग खूप लहान आहे.....मुठीत मावण्याएवढे असं का म्हणायचे......ऐकणं आणि बोलणं यामध्ये फक्त चार बोटांचच अंतर असतं असं का सांगितलं जायचं.....इतिहासाची पुनरावृत्ती होते असं का शिकवलं जायचं.....एक राजा असतो, एक राणी असते.....त्यांचे भांडण होते.......अन शेवटी ते सुखाने संसार करू लागले ...अशा गोष्टी का असायच्या.......जावून येतो असं म्हण असे घरी का शिकवायचे........सर्व काही उमजत होतं आज पहाटेच्या प्रहरी.........आणि हेही काळात होतं की 'दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघां पुन्हा नाही भेट'......हे ही किती खोटं होतं.
......हेलो......ओळखलस का?....... मी कोण बोलतेय?.......
शब्दांच काय गं, ते तर काना, मात्रा आणि वेलांटी यांनी भरलेला शब्दसंग्रह! त्याचा अर्थ कळतो जेंव्हा लेखक आपल्या लेखणीतून एकएक मणी गुंफावा तसे शब्द गुंफतो आणि जसा अलंकार बनवावा तशी कथा लिहितो.
शब्दांच काय गं, ते तर स्वर आणि व्यंजनाने भरलेला संच ! पण याचाही अर्थ उमजतो जेंव्हा प्रतिभाशाली कवी त्या शब्दांना आपल्या दोरखंडानी बांधतो, संगीतकार त्याला आपल्या स्वरांनी नादमुग्ध करतो आणि गायकाच्या गळ्यातून जसेच्या तसे उतरवितो.
तसेच हे तुझे पहाटेचे दोन शब्द.......माझ्या लेखणीस गुंफलेले आणि मनांत गुंतलेले!.......आपुलकीचे, आपलेपणाचे आणि ओलाव्याचे !
......हेलो......ओळखलस का?....... मी कोण बोलतेय?.......
तुला माहित आहे.......ओळख ही आवाजात नव्हतीच मुळी.....ती आवाजाच्या पलीकडची होती, ओळख होती ती स्पंदनाची ! स्पंदने होती हृदयांची की जी हजारो मैलावरून सुसाट वाऱ्याच्या वेगानं आलेल्या धूमकेतूची. तू मोबाईलचे हिरवे बटन दाबलेस तेंव्हाच ही स्पंदने एकजीव झाली होती आणि ओळखही तेंव्हाच झाली होती......कुठतरी त्याच रुपांतर फक्त शब्दात झालं होतं जेंव्हा मी माझ्या मोबाईलचे हिरवे बटन दाबले तेंव्हा.....
म्हणून आजही तुला ओळखण्याचा प्रश्न नव्हताच.......आपली ओळखही होतीच.....ओळख होती ती 'बालपणाची', ओळख होती ती 'अपूर्ण स्वप्नांची', ओळख होती ती 'न विसरलेल्या आठवणींची', ओळख होती ती 'भातुकलीच्या खेळामधली'........जशी काल......तशीच आजही......
..............फक्त 'क्षणभरासाठी' या दोनही आवाजांनी थोडी विश्रांती घेतली होती ! ......पुन्हा नव्यानं भेटण्यासाठी ..........!
........हेलो......ओळखलंय मी तुला.......तू...... ??? !!!